मद्यपींनी महिलांची छेडछाड केल्यास दहा वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: April 25, 2017 02:13 AM2017-04-25T02:13:16+5:302017-04-25T02:13:16+5:30
दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे
पारनेर (जि. अहमदनगर) : दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
अण्णा हजारे व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात गत आठवड्यात राळेगणसिद्धी येथे चर्चा झाल्यानंतर कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात आतापर्यंत शिक्षेविषयी संभ्रम होता. तो आता दूर झाला आहे, असे हजारे म्हणाले.
एखाद्या हॉटेलमध्ये विना परवान्याची दारू विकली जाते. या संबंधाने ग्रामरक्षक दलाने पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला कळविल्यानंतर त्यांनी त्या हॉटेल मालकांवर कारवाई करायची आहे. हॉटेल मालकावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या हॉटेलचा परवाना तत्काळ रद्द करावयाचा आहे.
ज्या गावातील २५ टक्के महिला ग्रामसभा घेऊन ठराव करीत असतील, की आमच्या गावात ग्रामरक्षक दल करण्यात यावे किंवा ग्रामपंचायतीने बोलविलेल्या ग्रामसभेमध्ये ५० टक्के लोकांनी ठरविले की आमच्या गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात यावे. तर तसा अर्ज उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे जाईल. उप विभागीय दंडाधिकारी तहसीलदारांना कळवतील व त्यानंतर तहसीलदार ग्रामरक्षक दल निवडीसाठी दिनांक, वार व वेळ निश्चित करून विशेष ग्रामसभा बोलावतील. सदर ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. तो ग्रामसभेचा पुरावा असेल. ग्रामसभा ग्रामरक्षक दलामध्ये कोण सदस्य असावेत, त्यांची नावे सुचवतील. दलामध्ये ३३ टक्के महिला असतील, असे हजारे म्हणाले. (प्रतिनिधी)