"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 08:28 PM2024-09-24T20:28:28+5:302024-09-24T20:30:03+5:30
Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: "बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे," असा दावा यावेळी पटोलेंनी केला.
Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: बदलापूर शालेय मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केले. या प्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही. विरोधी पक्षांनी या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा, तर विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहतील, असे खुले आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिले.
"बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे. हे अत्यंत भयावह आहे. ती शाळा भाजपा, आरएसएसची असून शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. साध्या पाकीटमारालाही पोलीस बेडी बांधून घेऊन जातात. मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का? तो काय तुमचा जावई होता का? ज्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का? बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? हे प्रश्न उपस्थित होतात. जे लोक या प्रकरणात आहेत त्या सर्वांना अक्षय शिंदे सारखीच शिक्षा द्या," अशी मागणी पटोले यांनी केली.
"केवळ बदलापुरातच अशी घटना घडली असे नाही, तर गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही अलिकडच्या काळात यापेक्षा भयानक घटना घडली आहे. राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.