युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती - देवेंद्र फडणवीस
By admin | Published: May 23, 2015 01:16 PM2015-05-23T13:16:56+5:302015-05-23T13:54:31+5:30
विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २३ - विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकारिणीचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू झाले असून त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दहा कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.
'विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, मात्र स्वबळावर लढल्यावर भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. आम्ही युतीतून वेगळे झालो म्हणूनच आम्हाला आमची ताकद समजली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या जनतेचाही पक्षाला आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला. गरिबी हटवण्यासाठी मोदी सरकारने जे काही केलं ते आधीच्या सरकारने कधीच केलं नाही, असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसला काळ्या पैशांवर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा असं कोणालाच वाटलं नव्हतं की भाजपा सत्तेत येईल. मात्र पक्षाच्या अनेक सदस्यांनी स्थापनेपासूनच अथक मेहनत केल्यामुळेच भाजपाला आज हे घवघवीत यश मिळालं आहे. अनेक सदस्यांच्या त्यागामुळे भाजपा आज यशाच्या शिखरावर असून जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारला यश मिळाले आहे, एक वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाली नाही असे ते म्हणाले. तसेच सत्तेतील भागीदारांनी आम्हाला वर्षभर पूरेपूर साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरिबीचे महत्वाचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत ती कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असून 'मेक इन इंडिया' हे त्यातील एक महत्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.