आमदार रोहित पवारांची फटकेबाजी; जर कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:02 PM2020-02-13T15:02:51+5:302020-02-13T15:04:16+5:30
दिल्लीत आप आणि भाजपा जी लढत झाली त्यातून शिकण्यासारखं बरचं काही आहे,
इस्लामपूर - आयुष्यात कोणी कितीही ताकदीचा समोर आला तरी घाबरू नका, कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवारसाहेबांची आठवण करावी, ईडीची भीती दाखवली, काही लोक इतिहासात राहतात, त्यांना असं वाटायला लागतं ते नवीन युगाचे चाणक्य झालेत, मग ते काही लोकांना भीती दाखवायला लागतात असा टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लगावला आहे. इस्लामपूरात कॉलेजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीत आप आणि भाजपा जी लढत झाली त्यातून शिकण्यासारखं बरचं काही आहे, केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये जाऊन लोकांशी बोलून विकास साध्य केला. लोकांचा विश्वास संपादित केला, त्यांच्याविरोधात अहंकार, मुजोरपणा होता. आमची ताकद खूप मोठी आहे आम्हाला कोणीच हरवू शकत नाही, आम्ही जे सांगेल ते होईल, ही ताकद आपविरोधात लढत होती असं त्यांनी सांगितले.
तसेच या ताकदीपेक्षा मोठी ताकद लोकांची होती, ती आपसोबत होती त्यातून शिकण्यासारखं बरचं आहे. शरद पवारांना भीती दाखवू असं अहंकारी ताकदींना वाटलं मग मोठं हत्यार म्हणून ईडीला बाहेर काढलं. पण स्वच्छ मनाचं हत्यार शरद पवारांकडे होतं. मी ईडीला समोर जातो असं शरद पवार म्हणाले, ईडीला जाण्यासाठी शरद पवार एकटे नाही तर सर्व जनता त्यांच्यासोबत आली. राज्यभरात लोक मुंबईत जमा होऊ लागले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पवारसाहेब थांबले मग ईडीनेही माघार घेतली. त्यामुळे कुणीही भीती दाखवली तरी काही होत नाही असं रोहित पवारांनी सांगितले.
दरम्यान, माझा न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही. त्यामुळे विजय सत्याचा होईल असं रोहित पवारांनी सांगितले. माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीला कोर्टात आव्हान दिलं आहे. कोर्टाने रोहित पवारांना नोटीस पाठवली आहे. कर्जत जामखेडच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला तसं माझाही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं ते म्हणाले.