पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्ष कारावास, विधेयक मंजूर
By admin | Published: April 7, 2017 04:40 PM2017-04-07T16:40:51+5:302017-04-07T17:29:42+5:30
पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. विधानसभेत विधेयक मांडण्यात आल्यानंतर ते मंजूर करण्यात आलं. पत्रकार हल्लाविरोधी विधेयकानुसार पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष जेलची हवा खावी लागू शकते. पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे. तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देण्यासाठीच्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आज गुरुवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या संदर्भातील विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. याच अधिवेशनात हे विधेयक आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या आधीच देण्यात आले होते.
गेल्या सहा वर्षात 17 हजार 682 अधिकाऱ्यांवर हल्ले झाले म्हणून जनतेच्या अधिकारांवर गदा आणत सरकारी अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षार्थ आयपीसीच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक तात्काळ मांडले. तेच अधिकारी तीच तत्परता चार वर्षात 337 पत्रकार आणि 52 मिडिया हाऊसवर हल्ले झाले म्हणून पत्रकार संरक्षण कायदा करण्याबाबत का दाखवत नाही, असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडू अशी घोषणा केली होती.
या कायद्याचा गैरवापर केला गेल्यास संबंधित पत्रकार व संस्थेलाही तेवढीच शिक्षा भोगावी लागणार आहे. याबरोबरच संबंधिताची अधीस्वीकृती पत्रिका कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व कोणतेही शासकीय लाभही मिळण्यास तो पात्र नसेल.