"बाळासाहेब हयात असते तर त्यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’ रामदास कदमांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:09 PM2022-08-07T16:09:48+5:302022-08-07T16:14:54+5:30
Ramdas Kadam: बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत.
मुंबई - बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. आताही आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांचा गद्दार म्हणून उल्लेख करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करू दिली असती का? असा सवाल रामदास कदम यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले की, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.
दरम्यान, आदित्य ठाकरे माझे मित्र होऊ शकत नाही, कारण त्यांचं वय ३२ आहे तर माझा राजकारणातील अनुभव ५२ वर्षांचा आहे. मातोश्री आमचं दैवत आहे, मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं नाही असं मी ठरवलंय. पण अगदी नाईलाज होतो, तेव्हा काही खुलासे करावे लागतात. उद्धव ठाकरेंना माझ्याकडून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा, असे रामदास कदम पुढे म्हणाले.
शिवसेना आणि शिंदे गट यांनी एकत्र यावं अशी इच्छा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने उदय सामंत यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत विचारले असता रामदास कदम म्हणाले की, उदय सामंत असं म्हणत असतील तर आनंद आहे. गुवाहाटीत असताना मीसुद्धा तसा प्रयत्न केला होता. त्यावेळी माझं ऐकलं गेलं नाही. शरद पवार आले. त्यांनी कानामध्ये काही सांगितलं. कायदेशीर लढाई लढायला सांगितले. आता न्यायालयीन लढाई सुरु असताना बाकीच्या गोष्टी कशा होऊ शकतात. रामदास कदम अचानक अॅक्टिव्ह कसे झाले. त्यांना मंत्रिपद द्यावं लागेल, विधान परिषद द्यावी लागेल. शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. या सगळ्या बातम्या मातोश्रीवरून पसरवल्या जातात, या बातम्या पसरवणाऱ्यांमागे मिलिंद नार्वेकर आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला.