"शिवसेना-मनसे एकत्र यावेत, हे बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 03:52 PM2022-09-06T15:52:25+5:302022-09-06T16:03:40+5:30
राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सांगितले.
मुंबई - बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु यावर आत्ताचं सांगणं कठीण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील ते हे नैसर्गिक आहे असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी मनसे-शिंदे गट युतीचे संकेत दिले आहेत.
किरण पावसकर म्हणाले की, मुंबई महापालिकेत कुणाशी कशी युती होईल याबाबत अजून कसलाही निर्णय झाला नाही. राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. माझा राग विठ्ठलावर नाही, आजूबाजूच्या बडव्यांवर आहे असं राज ठाकरेंनी पहिल्याच भाषणात म्हटलं होते. राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी जी भूमिका मांडली ती सर्वश्रूत आहे. आज इतक्यावर्षाने पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करणारे परंतु कार्यपद्धती वेगळी असणारे, दैवत आमचं एकच आहे. मात्र आजूबाजूच्या बडव्यांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसैनिक बाहेर पडले. याचा अर्थ मनसे आणि आमचा उद्देश एकच आहे. हिंदुत्वासाठी काम करण्याची वृत्ती आहे. मराठी माणसांसाठी लढणारी संघटना सर्वश्रूत आहे. जे १०-१२ वर्षापूर्वी बाहेर पडले त्याचप्रकारे शिंदेसोबत ४० आमदार त्याच उद्देशाने बाहेर पडलेत असं किरण पावसकर यांनी म्हटलं.
दरम्यान, सध्याच्या घडीला मनसे-शिंदे गट एकत्र येतील?, महापालिकेत एकत्रित निवडणुका लढवतील, हे गणित कसं जमवणार हे सांगता येणे कठीण आहे. परंतु राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्याचवेळी भाजपा-शिवसेना, सत्ताधारी आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे अशी माहिती प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिली.