भाताला यंदा ६० रुपये अधिक भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 02:39 AM2016-11-08T02:39:34+5:302016-11-08T02:39:34+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे.
जयंत धुळप, अलिबाग
गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यात विविध ठिकाणी शासनाच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
गतवर्षी रायगड जिल्ह्यात एकूण ५५ हजार ६१२ क्विंटल भात खरेदी झाली होती. यंदा त्यात विक्रमी वाढ होणार असून यंदा सुमारे ४ लाख क्विंटल भात खरेदी होणे अपेक्षित असून यंदा आॅनलाइन पद्धतीने भात खरेदी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटिंग संस्था रायगड यांच्यामार्फत जिल्ह्यातील खालापूर, महाड, पनवेल, सुधागड तालुक्यातील मंजूर केंद्रावर भात खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगाम कालावधीत २४ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ तर रब्बी पणन हंगाम कालावधी १ मे ते ३० जून २०१७ असा राहाणार आहे. भात खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीचा ७/१२ चा उतारा आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान वा भरडधान्य खरेदी करण्यात येईल. या धानाची खरेदी ही आॅनलाइन पध्दतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.