#VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!
By यदू जोशी | Published: September 16, 2019 06:28 AM2019-09-16T06:28:43+5:302019-09-16T07:41:25+5:30
शिवसेनेला युती नक्कीच करायची आहे आणि युतीदेखील होईल, पण भाजपच्या मनात ऐन वेळी वेगळे काही आले, तर सांगता येत नाही.
- यदू जोशी
मुंबई : शिवसेनेला युती नक्कीच करायची आहे आणि युतीदेखील होईल, पण भाजपच्या मनात ऐन वेळी वेगळे काही आले, तर सांगता येत नाही. तशी परिस्थिती आलीच, तर तुम्हीही तयार राहा, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच खासदारांच्या बैठकीत केल्याने युतीबाबत सगळेच आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
भाजपकडून शिवसेनेला जास्तीतजास्त १२0 जागा सोडण्यात येतील, अशा बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठकीत यासंबंधीची आपली अस्वस्थता बोलून दाखविली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. खासदार आणि जिल्हाप्रमुख यांच्या वेगवेगळ्या बैठका त्यांनी घेतल्या.
युती सन्मानाने होईल. युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा असेल, असे त्यांनी यावेळी सांगितल्याने शिवसेना १२0 जागांची भाजपची ऑफर स्वीकारणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते शिवसेनेचे हे दबावतंत्रदेखील असू शकते.
युती होणार, होणारच असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले, तरी प्रत्यक्ष जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत युतीमध्ये तणाव असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. आपल्याला यावेळी युती करायची आहे, पण २0१४चा अनुभव चांगला नाही. त्यावेळी भाजपकडूनच युती तोडण्यात आली होती, अशी आठवण उद्धव यांनी या बैठकीत करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार, विधानसभेच्या जागा आणि मंत्रिपदांबाबतही ‘फिफ्टी-फिफ्टी’ होईल, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.
>युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा टाकू नका
युती झाली, तर भाजपबरोबरच शिवसेनेतही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर तर बंडखोरी होणार नाहीच, पण भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरही शिवसेनेकडून बंडखोरी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आपल्याकडून युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा टाकला जाता कामा नये, असेही उद्धव यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
>केंद्रीय नेतृत्वाला तोडगा काढावा लागेल? : उद्धव यांनी ज्या पद्धतीने बैठकीत पक्षाचे खासदार, जिल्हाप्रमुखांना युतीबाबत सावध केले. त्यावरून युती सहजासहजी होणार नाही, तोडगा काढण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला उडी घ्यावी लागेल, असेही संकेत मिळाले.
>महत्त्वाचा प्रश्न
शिवसेना जसे १२0 जागांवर राजी होणार नाही, तसेच भाजप निम्मी मंत्रिपदे शिवसेनेला देण्यास तयार होईल का, असा युतीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करणारा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
>लोकसभेवेळी युती करताना विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार, विधानसभेच्या जागा व मंत्रिपदांबाबतही 'फिफ्टी-फिफ्टी' होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे कळते.