भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:38 AM2024-05-23T08:38:20+5:302024-05-23T08:39:04+5:30
Sharad Pawar Interview: मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महाराष्ट्रातून मोठा गेम होण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यावर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांचे मतदान झाले आहे. दोनच टप्पे राहिले असून ४ जूनला निकाल लागणार आहे. मोदी सरकार येणार असल्याचे अनेक राजनितीकार सांगत आहेत, तर विरोधकांसह काही भाकीतकार मोदींना बहुमत मिळणार नाही असा दावा करत आहेत. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्यात मविआला यश येत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच जर मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महाराष्ट्रातून मोठा गेम होण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यावर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला जात आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी शरद पवारांना खूप आधीपासून भाजपसोबत जायचे होते, असे दावे केले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेंना नको मी सोबत येतो असेही भाजपाला म्हटल्याचे दावे करण्यात आले आहेत. अशातच जर संधी आली तर पवार-ठाकरे एनडीएच्या दिमतीला जातील आणि पदरात सत्तेसह मंत्रिपदेही पाडून घेऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. यावर पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
भाजपाने सुरुवातीचा ४०० चा आकडा नंतर ३९०, ३५० वर आणला. याचाच अर्थ हा ट्रेंड खाली येत होता, ते शब्द जपून वापरायला लागले होते. आता तर त्यांचे बहुमत देखील कमी होतेय असा ट्रेंड दिसू लागला आहे. परिस्थिती बदललेली नाही. राज्यात मविआच्या जागा वाढतील, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. केजरीवालांच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ४०० पार सोडा बहुमताचा आकडा ते कुठेपर्यंत गाठू शकतील हे सांगणे देखील कठीण झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.
भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाहीतर माझ्यासारखे काही लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी पराकाष्ठा करतील, सत्ता स्थापनेची संधी असेल तर तसे प्रयत्न करणार असेही पवारांनी स्पष्ट केले. तसेच भाजपची धोरणे अयोग्य असून अशा परिस्थितीत त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही असेही पवार म्हणाले.