केंद्राने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीशी - बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:06 AM2021-01-31T06:06:41+5:302021-01-31T06:07:41+5:30
Anna Hajare News : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.
पारनेर : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.
बच्चू कडू यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन एक तास राज्यातील शेती प्रश्नांविषयी हजारे यांच्याशी चर्चा केली. मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर अण्णांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर ऊर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.
हजारे म्हणाले, समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत, त्यात बच्चू कडू आहेत. माझ्या साध्या पत्राचीही दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारने केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीत पाठविले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. थोडा विश्वास ठेवावा लागतो. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात, यावर माझा विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.