कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू : अटी वाढविल्या, तर ब्रजेशसिंह म्हणतात, परिपत्रकाची अडचण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:48 AM2020-10-01T02:48:03+5:302020-10-01T02:50:34+5:30
कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू : अनुदान मिळणारच; कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचारी कर्तव्यावर होता एवढेच बघितले जाईल
खुशालचंद बाहेती।
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे विशेष साहाय्य देण्यासाठी ठरविलेल्या अटींचे १८ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करताना त्या परिपत्रकातील सर्व अटी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. याशिवाय आयसीएमआर मान्यताप्राप्त हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची नवी अट लादण्यात आली आहे, असे असतानाच कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना विशेष साहाय्य देण्यात येईल. त्यावेळी परिपत्रक बघितले जाणार नाही. ते कर्तव्यावर होते एवढेच बघितले जाईल, इतर अटींना अर्थ नाही, असे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंह यांनी सांगितले आहे.
‘लोकमत’ने २७ सप्टेंबरच्या अंकात पोलीस महासंचालकांच्या १८ सप्टेंबरच्या परिपत्रकातील जाचक अटी व यामुळे पोलिसांतील अस्वस्थतेचे वृत्त दिले होते. या परिपत्रकात ५० लक्ष रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी मृत्यूपूर्वी १४ दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंध कर्तव्य केल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. यामुळे कंटनमेन्ट झोन, कोरोना रुग्णालय, कोरोना टास्कफोर्स, अशा विशिष्ट ठिकाणच्या कर्तव्यावर नसलेल्या कर्मचाऱ्यांना यासाठी बाद ठरविण्यात आले होते.दि.२८ सप्टेंबर रोजी प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेशसिंह यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात १८ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, १८ सप्टेंबरच्या परिपत्रकातील सर्व अटी २८ सप्टेंबरच्या परिपत्रकात जशाच्या तशा आहेत. याशिवाय यात मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र खाजगी रुग्णालयाचे असेल, तर ते रुग्णालय आयसीएमआरने कोविड-१९ उपचारासाठी मान्यता दिलेले आहे, असे प्रमाणपत्रही मागण्यात आले आहे. आयसीएमआर मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी वेबसाईटवर पाहावी, असेही परिपत्रकात नमूद आहे. मात्र, आयसीएमआर किंवा राज्य पोलिसांच्या वेबसाईटवर अशी यादी उपलब्ध नाही.
आयसीएमआर फक्त कोविड-१९ प्रयोगशाळांना परवानगी देते. स्थानिक प्रशासनाने कोविड-१९ रुग्णालय निश्चित केल्यानंतर याची माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर टाकली जाते. मात्र, आयसीएमआरकडून लेखी मान्यता अशी येत नाही. अशी मान्यता घ्यावी, असे शासनाचे निर्देश नाहीत.
- डॉ. नीता पाडळकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, औरंगाबाद मनपा
कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना विशेष साहाय्य देण्यात येणार आहे. कर्तव्यावर असणे वगळता इतर अटी परत घेतल्या आहेत.
- ब्रजेश सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक