खैरेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

By admin | Published: November 2, 2015 03:13 AM2015-11-02T03:13:33+5:302015-11-02T03:13:33+5:30

खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी

If the crime is not filed on Khayren, then the agitation | खैरेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

खैरेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

Next

औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी महसूल प्रशासनाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास मराठवाड्यात आंदोलन करून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शनिवारी अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांत द्वारसभा घेऊन कर्मचारी संघटनांनी खा.खैरे यांनी तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शिवीगाळ करण्याच्या घटनेचा निषेध केला. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चाही काढून डॉ.उमाकांत दांगट यांना निवेदन दिले.
‘लिफ्ट’ मिळविण्याचा प्रयत्न
वाळूज येथील धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईत त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनावर आगपाखड केली. शिवाय तहसीलदारांना शिवीगाळही केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर महाभारत घडले असतानाही शिवसेनेतील एकही आमदार, संघटनेचा प्रतिनिधी खैरे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. पालकमंत्र्यांच्या गटातील कुणीही खैरे यांना या प्रकरणात ‘लिफ्ट’ दिलेली नाही. खैरे सध्या अडगळीला आहेत. वाळूज, बजाजनगरच्या प्रकरणात जर त्यांना पुन्हा ‘लिफ्ट’ मिळाली तर ते पुन्हा आपल्या मानगुटीवर बसतील, अशी भीती उर्वरितांना असल्याची चर्चा आहे.
भाजपाची कोंडी...
भाजपाने बजाजनगर प्रकरणात खैरेंच्या निषेधाची भूमिका घेतली, तर दुसरीकडे पाडापाडी झालेल्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाहणी केली. मुळात भाजपाची या प्रकरणात कोंडी झाली आहे. खैरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात भाषण केल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर वगळता पक्षातून या प्रकरणावर कुणीही बोलले नाही. पश्चिम मतदारसंघातून भाजपाला नेतृत्व नाही. त्यामुळे पक्षाने याप्रकरणी खैरेंचा निषेध करून प्रकरण थांबविले. शिवाय खैरे मोठे होतील, या भीतीनेदेखील कुणी पुढे आले नसल्याची चर्चा आहे.
पोलिसांची गोची
पोलिसांची सध्या गोची झाली आहे. चार दिवसांपूर्वी प्रकरण घडले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात महसूल विभागातील सर्व संघटनांनी फिर्याद दिली आहे. परंतु पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे. खैरे यांनी न्यायालयाची बेअदबी केली आहे की नाही, याचा अहवाल न्यायालयाने मागविल्याचे समजते. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूक मतदानामुळे रविवारी सायंकाळपर्यंत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब के ल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांची गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत गोची झाल्याचे दिसते आहे.

Web Title: If the crime is not filed on Khayren, then the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.