वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू तर पत्नीचा भूकबळी !
By admin | Published: June 9, 2014 03:13 AM2014-06-09T03:13:22+5:302014-06-09T03:13:22+5:30
पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला.
नागपूर : पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर पत्नीचा भूकबळी गेला, असा पोलिसांचा संशय आहे.
वृद्धेचा भूक आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर वसाहतीत ही घटना उघडकीस आली.
रशीद मोहंमद नजीर मोहंमद (६२) आणि त्यांची पत्नी बिल्किस बानो रशीद मोहंमद (६१) असे या दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहात होते.
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी शनिवारी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दार उघडताच वृद्ध दाम्पत्याचे मृतदेहच त्यांना दिसले.
प्राप्त माहितीनुसार रशीद मोहंमद हे पूर्वी ट्रकचालक होते. तेच कुटुंबाचा एकमेव आधार होते. बिल्किस बानो या दोन्ही डोळ्यांनी आंधळ््या होत्या. दोन मुलांपैकी एक ट्रकचालक तर दुसरा खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघेही विवाहित आहेत. लहान मुलगा आठ-दहा दिवसांतून एकदा या दाम्पत्याला केवळ पाहून जात होता. चार-पाच दिवसांपूर्वीच वृद्ध रशीद मोहंमद यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अन्नपाणी देणाराच गेल्याने भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन वृद्ध बिल्किस बानो हिचाही मृत्यू झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. शवविच्छेदनानंतरच या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा होईल.