ओला दुष्काळ जाहीर केला तर कदाचित आम्ही सत्तारांचे विधान विसरू; रोहित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:40 PM2022-11-07T18:40:18+5:302022-11-07T18:46:14+5:30
मुंबई- शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे.
मुंबई- शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"बदला घेण्यासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. राज्यातील राजकीय परंपरा बाजूला ठेवून टीका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
"मंत्री अब्दुल सत्तार यांना बोलायचेच असेल तर त्यांनी या लेवलला न जाता राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. दुसऱ्या नेत्यांनीही अशा टीका केल्या आहेत. राज्यपाल यांनीही अशी खालच्या पातळीला जावून टीका केली आहे. आम्ही या टीकेचा निषेध करतो. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचा माफी मागावी. सत्तार आता राज्याचे कृषीमंत्री आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. जर त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला तर कदाचित आम्ही त्यांनी केलेले वक्तव्य विसरुन जाऊ, असही आमदार रोहित पवार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांनी टीका काय केली?
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.