मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:10 PM2021-07-09T14:10:26+5:302021-07-09T14:30:48+5:30
Sambhaji Raje Chhatrapati statement on Maratha Reservation :अधिवेशनात कुठल्याच नेत्याने आरक्षणाबाबत आवाज उठवला नाही
कोल्हापूर:मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 'सारथीव्यतिरिक्त इतर मागण्यांबाबत सरकारकडून जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार,'असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आता समाज नाही, तर लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. अधिवेशनात कुणीच काही बोलले नाहीत. मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा कधी काय करायचे हे आम्हाला माहीत आहे. सरकारने एमपीएससीच्या 2185 तरुणांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.
'सारथी'साठीची 1 हजार कोटींची मदत जाहीर करावी
'सरकारने सारथीसंदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि 1 हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. मलाही कल्पना आहे, की हजार कोटी एक वर्षात खर्च करणे, एवढे सोपे नाही. त्यासाठी तुम्ही तीन फेज करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे, सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, सारथी बोर्डाची महत्वाची बैठक 14 जुलै रोजी होणार असून, या बैठकीनंतर पुढील रुपरेशा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारला मागण्या मान्य
ते पुढे म्हणाले की, मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटलांनीही कसे आरक्षण मिळणार हे सांगितले. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, ते काही चुकीचे करतील असे मला वाटत नाही. मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 21 जून रोजी सांगितले होते. सरकारने 21 दिवसांत निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असेही संभाजीराजे म्हणाले.