...तर लोकशाही टिकणार नाही, जावेद अख्तर : दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त निषेध जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:38 AM2017-08-21T04:38:53+5:302017-08-21T04:38:58+5:30
परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते; तसे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत.
पुणे : परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते; तसे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत. अभिव्यक्तीवर बंधने घातली जात आहेत. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यानी प्रश्न विचारण्याचा हक्क हिरावून घेतला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सद्यस्थितीवर टिप्पणी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध जागराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, शैला दाभोलकर हे उपस्थित होते. आमचा आवाज, हाच देशाचा आवाज आहे, असे कोणी म्हणू लागले तर आपण सावध व्हायला हवे, असे ते म्हणाले.
डॉक्टर गेल्यावर चळवळीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, ज्ञानाची शिदोरी घेऊन प्रत्येक जण चळवळीत सहभागी झाला. डॉक्टरांनी कायम विवेकवादाचा नकाशा डोळ्यांंसमोर ठेवला. त्यांना अनेकांनी साथ दिली. मला त्यांचा ४२ वर्षांचा सहवास लाभला. हाच आनंद सोबत घेऊन मी पुढे काम करत राहणार आहे. - शैला दाभोलकर
आज जग बदलले आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. मात्र, समाजावरचा धार्मिक बाबींचा पगडा कमी झालेला नाही. धर्म हा लालसा आणि भीती या दोन बाबींवर चालतो. तो प्रश्न विचारण्याची मुभा देत नाही. श्रद्धा असेल तर सर्वधर्म मानायला काय हरकत आहे, असा सवालही अख्तर यांनी केला.
मुसळधार पावसात ‘जबाब दो’ आंदोलन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रविवारी सकाळी मुसळधार पावसात निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर यांच्यासह कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार याची विचारणा करणाºया घोषणा देत ‘जबाब दो’चा पुकार यात करण्यात आला.
भर पावसामध्ये छत्र्या, रेनकोट घेऊन मोठया संख्येने कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते. सकाळी साडेसात वाजता महर्षी शिंदे पुलावरून मोर्चाला सुरूवात झाली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावा, कॉ. मुक्ता मनोहर, अंनिसचे सरचिटणीस हमीद दाभोलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साताऱ्याच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात गंभीर आणि धक्कादायक निरीक्षणे नोंदविल्याने अंनिसच्या घोटाळ्याची तीव्र्रता व सत्यता सिद्ध झाली आहे. त्यामुळे अंनिस आणि डॉ. हमीद दाभोलकर यांचे पितळ उघडे पडले असून इतरांना ‘जवाब दो’ म्हणणाºया तथाकथित विवेकवाद्यांनी राज्याच्या जनतेला जवाब द्यायला हवा, असे मत प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केले. अंनिसची नोंदणी रद्द करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने आंदोलन केले.