उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मैत्री व्हावी, दोघंही राजकारणात राहावेत; रामदास आठवलेंची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:57 PM2024-08-01T17:57:46+5:302024-08-01T17:59:15+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
पुणे : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नितीन गडकरींचा नंबर लागला होता. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
गुरुवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी रामदास आठवले यांनी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कोणालातरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
याचबरोबर, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर ती आनंदाची गोष्ट आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल. फडणवीसांचा भाजपला चांगला उपयोग होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
"ठाकरे-फडणवीस यांच्यातील वाद मिटला नाही तर..."
राजकारणात सध्या उद्धव ठाकरे वर्सेस देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. यावर रामदास आठवले म्हणाले, राजकारणामध्ये दोघेही राहतील. एकाचं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडले असं नाहीये. मला वाटतंय राजकारणात दोघेही राहतील. उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी. पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी आहे, असे विधान रामदास आठवले यांनी म्हटले आहे.