"देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’, नाना पटोले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:45 PM2024-07-29T16:45:11+5:302024-07-29T16:48:27+5:30
Nana Patole Challenge Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा त्यांचा दावा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता, हे अनिल देशमुख यांनी जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतरच सांगितले होते मग कालपर्यंत देवेंद्र फडणवीस गप्प का बसले?, देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही. फडणवीस सरकार असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करत होते, ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक पदी बढती दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धमकी देण्याऐवजी वस्तुस्थिती मांडावी.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिलेली आहे. समित कदम हा सरकार व व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्ती आहे म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, ही जनतेच्या पैशाची लुट आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, खून, दरोडे, बलात्कार वाढले आहेत, त्याकडे गृहखात्याचे व सरकारचे लक्ष नाही पण आपल्या बगलबच्च्यांसाठी पोलीस दल तैनात ठेवले आहे, असे पटोले म्हणाले.
नवी मुंबईतील उरणमध्ये एका मुलीवर अत्याचार करून तीची निघृण हत्या करण्यात आली, ही घटना अत्यंत गंभीर आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत, मुंबई व आसपासच्या भागातच महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागातील अवस्था काय असेल त्याचा विचार करा. राज्यातून १५ हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता आहेत. सत्तेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बसले आहेत, गुन्हेगारांना कशाचीही भिती राहिलेली नाही. उरण घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.