शिस्त मोडाल, तर सगळे पुन्हा बंद करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:38 AM2020-06-01T05:38:01+5:302020-06-01T05:38:13+5:30
शिक्षण, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण तुम्ही जर शिस्त मोडाल, रस्त्यावर गर्दी करुन गोंधळ घालाल तर पुन्हा सगळंच बंद करण्याची वेळ येईल. तुम्ही ते करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री जनतेला संबोधित करताना केले. येत्या रविवार म्हणजे ७ जूनपासून वर्तमानपत्र घरोघरी वाटप करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही या जाणिवेतून करू. शिक्षण आणि आरोग्य हे या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. तुम्ही खबरदारी घ्या; मी जबाबदारी घेतो असे सांगताना आता दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही, या जाणिवेतून करू असेही ठाकरे यांनी ठासून सांगितले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मुलांना तातडीने परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टर की सरासरी काढून गुण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा धरलेला आग्रह खोडून काढला आहे.
अनेक लोक शेवटच्या क्षणी रुग्णालयात धाव घेतात, आणि उपचार करण्याच्या आत त्यांचा दुदैर्वी मृत्यू होतो. हा आजार अंगावर काढण्यासारखा नाही. थोडा जरी ताप असला किंवा लक्षण असले तरी तातडीने डॉक्टरला दाखवा. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करेल, लॅबची संख्या वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मी जे बोललो त्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना राग आला पण त्यांनी त्या रागातून का होईना रेल्वे दिल्या. त्यामुळे बारा लाख लोक परराज्यात जाऊ शकले. एसटी महामंडळाने पाच लाख लोकांना राज्याबाहेर नेऊन सोडले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रुग्णांचा ६५ हजार आकडा दिशाभूल करणारा
राज्यात २९ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून फक्त ३४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २४ हजार रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. आज महाराष्ट्रात फक्त दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १२०० रुग्ण गंभीर आहेत, मात्र बाकी सगळे रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ६५ हजार हा आकडा दिशाभूल करणारा आहे, पण मोजण्याची ती पद्धत असल्यामुळे तो आकडा येतो असे सांगितले. अशा आकड्यांचा आधार घेऊन महाराष्ट्रातील आपलेच लोक आयुष्यभर महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असेही त्यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.