एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 05:04 PM2024-11-21T17:04:25+5:302024-11-21T17:05:01+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या सोबत गेले तर? या प्रश्ननावर शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, नेमके चित्र 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. पण, एक्झिट पौलनुसार राज्यात महायुतीचे सरकार आले, तर मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यातच, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या सोबत गेले तर? या प्रश्ननावर शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि दुय्यम पदावर तुम्हाला सत्तेत रहावे लागले तर काय कराल? असे विचारले असता छत्रपती संभाजीनगर येथे टीव्ही ९ सोबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "यासंदर्भात केवळ एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यासंदर्भात आम्हाला भाष्यदेखील करता येणार नाही. त्यामुळे शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ते योग्य दिशेनेच जात असतात, असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. यामुळे त्यांच्या दिशेनुसारच आम्ही त्यांच्या मागे त्यांचा शर्ट पकडून जाऊ."
यावर, जर ते (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या सोबत गेले तर? असे विचारले असता, "एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आम्ही त्यांच्या सोबतीनेच राहू. ते कुठेही गेले अथवा त्यांचा निर्णय कसाही असला, तरी आमचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि तो कायम आहे," असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
भाजप मोठा भाऊ आम्ही त्यांचे सख्खे भाऊ -
भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे आणि आम्ही त्यांचे सख्खे भाऊ आहोत. मोठा भाऊ छोट्या सख्ख्या भावाला सहकार्य तर करतोच ना. यामुळे आम्हाला त्यांचे सहकार्य राहील. अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही शिरसाट यावेळी म्हणाले.