'निवडणुका लागल्यास एकत्र येऊ'; प्रकाश आंबेडकर- उद्धव ठाकरेंमध्ये १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:13 PM2022-11-20T22:13:50+5:302022-11-20T22:23:14+5:30
Prakash Ambedkar talk on Uddhav Thackeray alliance: प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली.
आम्ही एकत्र कधी येणार हे निवडणुका कधी लागतील त्यावर अवलंबून आहे. आता लागल्या तर ताबडतोब. नंतर लागल्या तर नंतर, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. तर कार्यक्रमात वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.
Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला
कार्यक्रमापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे टीव्ही ९ ला सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे-आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू काही दिवसांपूर्वीच आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु होती. यावर आज आंबेडकर यांनी पडदा टाकला.
वेबसाईटच्या अनावरण प्रसंगी आंबेडकर म्हणाले की, 700 वर्षांपूर्वी वारी सुरु झाली ती सुद्धा एक बंड आहे. संतांनी संगितलेले की आम्ही वेगळ्या पद्धतीने राहणार. यासाठी केलेली ही एक व्यवस्था होती. धर्माने सांगितलेली आणि संतांनी सांगितलेली आणि वैदिक धर्माने सांगितलेली सामाजिक व्यवस्था याचा टकराव झाल्याने भांडणे होत असतात, असे ते म्हणाले.
सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही मांडलेला नाही. तुम्ही त्याला बंदिस्त करु शकत नाही. कारण पिढी जशी बदलली जाते तसे सर्वच बदलत जाते. आपले विरोधक आहेत ते लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. लोकशाही पाहिजे की हुकूमशाही पाहिजे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. प्रत्येक मतदार स्वतःचे मत ठरवत नाही. तोपर्यंत इथे असलेली व्यवस्था शांततेने जगू देईल असे वाटत नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही दोघांचे नातू इथे बोलत आहोत. काही आजोबा बोलत आहेत. मग वाट दाखविणाऱ्यांना आदर्श मानायचे की वाट लावणाऱ्यांना मानायचे, हा प्रश्न पडला आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नाव न घेता लगावला.
घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.