कधी मरण तर कधी यातना
By admin | Published: May 4, 2016 09:34 PM2016-05-04T21:34:22+5:302016-05-04T21:34:22+5:30
व्यंगचित्रात एक विचार, कला आणि व्यंग्य या त्रिमूर्तीचा समावेश असतो. अनेकदा एकटा व्यंगचित्रकारच समस्त समाज आणि वर्गाच्या हृदयाची तार छेडत असतो
व्यंगचित्रात एक विचार, कला आणि व्यंग्य या त्रिमूर्तीचा समावेश असतो. अनेकदा एकटा व्यंगचित्रकारच समस्त समाज आणि वर्गाच्या हृदयाची तार छेडत असतो. पूर्वी गुंफामध्ये राहणाऱ्या आणि तेथील भिंतीवर आपल्या कलेची छाप सोडणाऱ्या ग्रीक लोकांना व्यंगचित्राचे जनक मानले जात होते. परंतु वास्तविक दस्तऐवज लक्षात घेतले तर हा सन्मान १५९० मध्ये इटलीचे एनिबल आणि अगोस्तिनी कार्सी बंधूंनी ‘रित्रातिनी केरिची’ या नावाने जारी केलेल्या मालिकेला दिला जाऊ शकतो.
युरोपमध्ये राजकीय उलथापालथ आणि परिवर्तनाच्या काळात व्यंगचित्रांनी आपले स्थान अधिक पक्के केले होते. साधारणपणे व्यंगचित्र हे स्वत:ला जगाचा शहेनशाह समजणाऱ्या हुकूमशहा आणि राजेरजवाडे यांच्यावरील सामान्य माणसाने केलेले भाष्य किंवा टिप्पणीच्या रूपात राहत असत. त्यावेळीदेखील व्यंगचित्रकारांना बहिष्कार, अटक आणि धमक्यांचा सामना करावा लागत असे. नाझी फॅसिस्टांविरुद्ध व्यंगचित्र बनविल्याबद्दल १९४४ मध्ये पोलँडच्या व्यंगचित्रकारांना मृत्युदंड देण्यात आला होता.
१९७० मध्ये तुर्कीच्या हुकूमशाही सरकारने तत्कालीन व्यंगचित्रकार तुरहन सेलकुक यांनाही प्रचंड यातना दिल्या होत्या. अमेरिका-रशियादरम्यानच्या शीतयुद्धाने व्यंगचित्रकारांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. भारतात ब्रिटिश राजवट आपल्या शिखरावर असताना स्वदेशी व्यंगचित्रकारांची एक नवी पिढी जन्माला आली. दिवंगत शंकर पिल्लई हे भारतीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जातात. त्यांच्यानंतरही अनेक श्रेष्ठ दर्जाचे व्यंगचित्रकार जन्माला आले आणि त्यांनी संपूर्ण देशाचे मनोरंजन आणि जनजागृती केली.
क्षेत्रीय भाग आणि भाषांमध्येही व्यंगचित्रकार निर्माण झाले आणि ते हळूहळू समाजाचा आवाज बनले. आर.के. लक्ष्मण, काक, सुधीर तेलंग, रंगा, मारियो मिरांडा यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यंगचित्रकारांचा दरारा होता. तर मराठी, तेलगू, तामीळ, बंगाली, गुजराती आणि पंजाबी यासारख्या समस्त प्रादेशिक भाषांमधील व्यंगचित्रकारांनी स्थानिक समस्यांसह आपली छाप सोडली. व्यंगचित्रकारांची ही लाट आता टीव्ही आणि इंटरनेटपासून तर सोशल मीडियापर्यंत पसरली आहे. हास्य, भाष्य आणि बोचरी टिप्पणी यासह सकाळच्या वेळी आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा क्रम असाच सुरू राहील, अशी आशा आहे.