फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:32 AM2022-08-14T06:32:45+5:302022-08-14T06:33:21+5:30
Nitin Gadkari : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते.
नागपूर : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ‘आपण मुख्यमंत्र्यांबाबत शुभेच्छा दिल्या नाहीत, तर पुन्हा मीडियावाले गडकरी-फडणवीस आमने-सामने लावतील’, अशी कोपरखळी मारत गडकरींनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा दुसऱ्याच क्षणाला समजा पुढे फडणवीस मोठे झाले, केंद्रात गेले, तर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.
भाजपमध्ये घराणेशाही नाही. त्यामुळे आता मला नाहीतर माझ्या मुलाला, पत्नीला तिकीट द्या, हे धंदे बंद; पण जनता म्हणेल तर नक्की तिकीट मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
अध्यक्षपद सोपवून बावनकुळेंचा मोठा सन्मान : फडणवीस
गेल्या निवडणुकीत बावनकुळे यांना थांबावे लागले. त्यावेळी लोक बावनकुळे यांचे राजकारण संपले असे सांगत होते; पण भाजपची ध्येय, धोरणे, नीती आपल्याला ठावूक आहे. बावनकुळे यांनी लगेच निर्णय स्वीकारला. त्यांच्या पक्षनिष्ठेला तोड नाही. ३२ मतदारसंघांचे दौरे करून प्रचार केला. मी त्याच दिवशी बोललो होतो, जनतेच्या मनातील नेता असलेल्या या कार्यकर्त्याला एक दिवस याहीपेक्षा मोठे पद मिळेल. आज तो क्षण आपण अनुभवत आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचा गौरव केला.