विदेशी तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर जरा सावधान!

By admin | Published: April 19, 2017 01:15 AM2017-04-19T01:15:38+5:302017-04-19T01:15:38+5:30

तुम्हाला एखाद्या विदेशी तरुणीची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आली आहे का? जर असे असेल तर जरा जपून... सध्या विदेशी तरुणींच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवून अनेकांना लाखोंचा चुना लावणारी टोळी सक्रिय आहे

If the foreign woman's request came, then be careful! | विदेशी तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर जरा सावधान!

विदेशी तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर जरा सावधान!

Next

मुंबई : तुम्हाला एखाद्या विदेशी तरुणीची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आली आहे का? जर असे असेल तर जरा जपून... सध्या विदेशी तरुणींच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवून अनेकांना लाखोंचा चुना लावणारी टोळी सक्रिय आहे. भांडुप पोलिसांनी अशाच एका नायजेरीयन पती-पत्नीवर केलेल्या कारवाईनंतर ही ‘मोडस् आॅपरेंडी’ समोर आली आहे. नाग्बू बेंसन ओरायजुका (३९) आणि नेहारिका ओरायजुका (३७) अशी आरोपी नायजेरीयन जोडप्याची नावे आहेत. दोघांनी मिळून भांडुपच्या एका शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्याला फेसबूकवरून १४ लाखांचा गंडा घातला.
भांडुपचे रहिवासी असलेले शेअर ट्रेडिंगमधील व्यापारी संदीप सिंग यांना आॅक्टोबर २०१६मध्ये इंग्लंडमधील मर्सी जॉन या तरुणीच्या नावावे ‘फ्रेण्ड्स रिक्वेस्ट’ आली. हे बनावट खाते या नायजेरीयन दम्पत्याचे होते. सिंग यांनी ‘फ्रेण्ड्स रिक्वेस्ट’ स्वीकारताच आरोपी दाम्पत्याने +४४ नंबरने सुरू होणारा एक मोबाइल नंबर सिंग यांना पाठविला. त्यावर नेहारिका व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे संदीप सिंग यांच्यासोबत संवाद साधत होती. आपण इंग्लंडमधील आॅस्ट्रिजन नावाच्या एका कंपनीत मॅनेजर असल्याचे तिने सिंगला सांगितले. सिंगचाही तिच्यावर विश्वास बसला. दोघांमध्ये संवाद वाढला. तिने सिंगची अधिक माहिती काढली.
सिंग जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, नेहारिकाने आपली कंपनी औषधे बनविण्यासाठी हर्बल सीड्स विकत घेत असल्याचे त्याला सांगितले. मात्र हे सीड्स पुरविणारा सप्लायर अमेरिकेत गेल्याने आमची कंपनी नव्या सप्लायरच्या शोधात असल्याचे तिने त्याला पटवून सांगितले. सिंगनी याबाबत अधिक विचारणा करताच नेहारिकाने
दुप्पट फायद्याचे आमिष त्याला दाखविले. त्याला सिंगदेखील बळी पडला.
पुढच्या टप्प्यात तिने कंपनीचे संचालक म्हणून तिचाच पती असलेल्या नाग्बूची सिंगसोबत ओळख करून दिली. त्यानंतर कंपनीच्या नावाने एक मेल सिंग यांना पाठवला. सॅम्पल पाहण्यासाठी कंपनीचा एक अधिकारी भारतात येईल, असेही तिने सांगितले. सिंगही तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. जास्तीच्या पैशांचे त्याला स्वप्न पडू लागले होते. ही संधी साधून नेहारिकाने भारतातील एक छोटा सप्लायर ओळखीचा असून, त्याच्याकडून तू हर्बल सीड्स मागव, असे सिंगला सांगितले. नेहारिकाने सांगितलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून सिंगने त्याच्याकडून हर्बल सीड्सचे कोटेशन मागवून घेतले. हे कोटेशन दुप्पट रक्कम करून इंग्लंडमधील मर्सी जॉनच्या तथाकथित आॅस्ट्रिजीन कंपनीला पाठविले. कंपनीने हे कोटेशन मान्य असल्याचे कळवले. पहिल्या असाईनमेंटसाठी नेहारिकाने मर्सी जॉन बनून ओळख करून दिलेल्या व्यक्तीकडून हर्बल सीड्स मागविल्या. या व्यवहारासाठी त्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात सिंग यांनी २ लाख ५० हजार रुपये भरले. त्यानुसार एक पार्सल कुरियरने सिंग यांच्या घरी आले. हर्बल सीड्स हाती मिळताच सिंग यांनी आॅस्ट्रीजीन कंपनीला कळविले.
आॅस्ट्रीजीन कंपनीचा अधिकारी बनून विल्यम नावाने नाग्बू हाच सिंग यांना भेटण्यासाठी बीकेसीतील इंग्लंडच्या दूतावासाजवळ आला. विल्यमने सिंगकडून सीड्स घेण्याचे मान्य केले. त्यानंतर सिंगला कंपनीने ५० पॅकेटची आॅर्डर दिली. मोठी आॅर्डर मिळाल्याने सिंग यांनी हर्बल सीड्स पुरविणाऱ्या व्यक्तीला फोन केला. सीड्स पुरवणाऱ्याने आधी पैशांची मागणी केल्याने सिंग यांनी सुरुवातीला ६ लाख ५० हजार आणि त्यानंतर ३ लाख ५० हजार आरटीजीएसद्वारे दिलेल्या बँक खात्यात भरले.
हे पैसे मिळताच मर्सी जॉन उर्फ नेहारिका आणि त्या सप्लायरने मोबाइल नंबर बंद केले. तुम्ही माल पाठविला नाही, म्हणून तुमचे पैसे आम्ही डॉलर्समध्ये परत करत आहोत, असा ई-मेल करून त्यासाठी कन्साईनमेंट चार्जच्या नावाखाली सिंग यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये उकळले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंगने थेट भांडुप पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.


‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारताना घ्या काळजी
कुठल्याही अनोळखी व्यक्तींची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारताना त्याची शहानिशा करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. अनेकदा तरुण-तरुणी कुठलाही विचार न करता फक्त प्रोफाईल फोटो पाहून ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारतात. याचा फटका त्यांना पुढे बसतो. त्यात खातेदाराबाबत संशय येताच मुंबई पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या पथकाने बीकेसीमध्ये झालेल्या भेटीचे ठिकाण गाठले. त्यात मिळालेल्या माहितीत आरोपी हे दिल्लीतील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला दिल्लीमधून अटक केली. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, १४ मोबाइल, वेगवेगळ्या देशांची सीम कार्ड, इंटरनेट डोंगल, मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींनी सिंग यांच्यासोबतच मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात आणखी काही व्यावसायिकांना फसविल्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: If the foreign woman's request came, then be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.