इच्छापूर्ती, नवसाला पावणारा असा उल्लेख केल्यास गणेश मंडळांवर हाेऊ शकते कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:22 PM2019-08-30T16:22:26+5:302019-08-30T16:22:50+5:30
इच्छापूर्ती गणेश, नवसाला पावणारा गणपती असा उल्लेख केल्यास गणेश मंडळांवर जादुटाेणा विराेधी कायद्यांतर्गत कारवाई हाेण्याची शक्यता आहे.
पुणे : जास्तीत जास्त भक्त आपल्या मंडळात यावेत या हेतूने जर गणेश मंडळांनी नवसाला पावणारा गणपती, इच्छापर्ती करणारा गणपती असा उल्लेख केल्यास त्यांच्यावर जादुटाेणा विराेधी कायद्यांतर्गत कारवाई हाेऊ शकते. त्यामुळे मंडळांनी असा उल्लेख करण्याचे टाळावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात आले आहे.
समाजातील अनिष्ठ रुढी परंपरांच्या विराेधात कारवाई करण्यासाठी जादुटाेणा विराेधी कायदा 2017 साली अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत अनिष्ठ प्रथा चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. गणेशाेत्सवात अनेकदा काही गणेश मंडळं भाविकांची गर्दी खेचण्यासाठी इच्छापूर्ती गणपती, किंवा नवसाला पावणारा गणपती अशी पाटी लावतात. यामागे अनेकदा माेठे अर्थकारण देखील असते. त्यामुळे एखाद्या मंडळाने आपला गणपती नवसाला पावणारा आहे. किंवा इच्छापूर्ती गणेशमुर्ती आहे असा दावा केल्यास त्यांच्यावर जादुटाेणा विराेधी कायद्याअंतर्गत कारवाई हाेऊ शकते.
याविषयी बाेलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सचिव मिलिंद देशमुख म्हणाले, जादुटाेणा कायद्यांतर्गत चमत्काराचा दावा करणे हा गुन्हा आहे. अनेकदा गणेश मंडळे आपल्या मंडळाकडे जास्तीत जास्त भाविक खेचण्यासाठी नवसाला पावणारा किंवा इच्छापूर्ती गणपती असल्याचे म्हणतात. परंतु या गाेष्टींपासून मंडळांनी दूर रहावे. भाविकांची गर्दी वाढविण्यासाठी मंडळांनी विधायक कार्यक्रम करावेत. एखादे मंडळ असा दावा करत असल्यास त्या भागातील दक्षता अधिकारी गुन्हा दाखल करु शकताे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने सर्व मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की या प्रकारापासून त्यांनी दूर रहावे.