लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा...; महादेव जानकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 03:08 PM2023-07-10T15:08:05+5:302023-07-10T15:08:40+5:30

महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला

If given five Lok Sabha seats, with BJP otherwise...; Warning of Mahadev Jankar | लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा...; महादेव जानकरांचा इशारा

लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा...; महादेव जानकरांचा इशारा

googlenewsNext

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच एनडीएमधील (NDA) मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे. 

राज्यात भाजपमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे नवीन गट सामील झाल्यामुळे एकप्रकारे महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला. यावेळी सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता शहाणी असते, असा टोला महादेव जानकर यांनी भाजपला लगावला आहे. 

राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात आजपासून महादेव जानकर हे आपल्या पक्षाची यात्रा घेऊन निघालेले आहेत. भाजपने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एक दिवस मी देशाचा पंतप्रधान बनणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणार असा दावाही महादेव जानकर यांनी केला. 

याचबरोबर, बारामती लोकसभा हा आपला आत्मा असून बारामतीची जागा यासाठीच मागितली असून तिथूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, शरद पवार हे खूप हुशार व मातब्बर राजकारणी आहेत, सध्या राष्ट्रवादीचे काही नेते अडचणीत आल्याने त्यांनी अजित पवार यांना इकडे पाठवले असण्याची शक्यताही महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान, महादेव जानकर यांच्या भूमिकेमुळे आगामी निवडणूक काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांची भूमिका भाजपला चांगलीच अडचणीत आणणारी ठरू शकते. कारण, बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या महादेव जानकर यांनी मागितलेल्या सर्व पाचही जागांवर आतापर्यंत भाजप निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आगामी काळात रासप भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.

Web Title: If given five Lok Sabha seats, with BJP otherwise...; Warning of Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.