"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:32 PM2023-10-02T13:32:38+5:302023-10-02T13:41:36+5:30

सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाबाबतही काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. 

"If giving dates regarding the decision of the Election Commission...", Supriya Sule clearly stated | "निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

googlenewsNext

वर्धा :  विदर्भाच्या दौऱ्यादरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाबाबतही काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. 

खासदार सुप्रिया सुळे या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. सोमवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्धा येथे दाखल झाल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षातला एक गट बाहेर गेलेला आहे. मात्र, बाहेर गेलेल्या नेत्यांकडून स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाबाबत भाष्य केले जात आहे. 

जे पक्षातून बाहेर गेलेत ते निवडणूक आयोग झाले आहेत का? त्यांचे नेते आयोगाचे अध्यक्ष आहेत का? निवडणूक आयोगाने वेगळी काही बातमी दिल्लीच्या अदृश्य हातांनी त्यांना दिली आहे का? मग, आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही? असे सवाल करत धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर याचा अर्थ पेपर फुटला आहे. पेपर फुटला असेल तर आम्ही आयोगाला नक्की प्रश्न विचारू, ही तारीख यांना कशी कळाली?, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

याचबरोबर, सद्य:स्थितीत ९५ टक्के खटले विरोधी पक्षांतील नेत्यांवर आहेत. सत्तापक्षात ते सहभागी झाले की, त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात येतात. हा चुकीचा पायंडा भाजपने पाडला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न जसे महागाई, बेरोजगारी आदी मागे पडत चालले आहेत. भाजप केवळ सत्तेसाठी घरं आणि पक्ष फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पवनार आश्रमला सुद्धा सदिच्छा भेट देत गौतम बजाज यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी गौतम बजाज यांनी सुप्रिया सुळे यांना इंदिराजींच्या काळापासूनची माहिती दिली. तसेच, राजकीय विषयापेक्ष्या कौटुंबिक विषयाला जास्त महत्व देत आश्रम हे प्रेरणास्थान असल्याचे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

Web Title: "If giving dates regarding the decision of the Election Commission...", Supriya Sule clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.