मागेल त्याला नाही, तर मिळेल त्याला शेततळे
By admin | Published: May 14, 2016 12:30 AM2016-05-14T00:30:33+5:302016-05-14T00:30:33+5:30
‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी
घोडेगाव : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी व शर्ती पाहिल्या असता ‘मिळेल त्याला शेततळे’ असे नाव या योजनेचे ठेवले पाहिजे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान व टंचाई आढावा बैठकीत केली.
आंबेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून १३ गावांमध्ये कामे सुरू आहेत. या गावातील कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दोन टँकर सुरू असून, अजून सहा टँकरची मागणी झाली आहे. नुकतेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळात तालुक्यात लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर या सहा गावांचा समावेश होतो. येथील लोकांना शासन देणार असल्याच्या सुविधांची चर्चा झाली.
या वेळी प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, एस.बी. देवडे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, आंबेगाव तहसीलदार बी. जी. गोरे, शिरूर तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, संजय पिंगट, पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे, संजय गवारी, खंडू पारधी, सुषमा शिंदे, अनिता निघोट, प्रियंका लोखंडे, मालिनी भोर, रेवती वाडेकर, प्रकाश घोलप इत्यादी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, मागेल त्याला शेततळे या योजनेत शासनाने घातलेल्या अटी किचकट आहेत. शेततळे घेण्यासाठी संबंधित गाव पाच वर्षात एक वर्ष पन्नास टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेले असावे व लाभार्थ्याकडे कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फक्त ५५ गावे आली आहेत. येथील ४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते मात्र अवघे १६ लाभार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवी असून त्याला नाव ‘मिळेल त्याला शेततळे’ असे दिले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.