राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:57 AM2019-08-09T02:57:36+5:302019-08-09T02:57:59+5:30

पुराच्या काळात सरकारच अस्तित्वहीन असल्याचे टीकास्त्र

If the head of the state is moved, then the system will move! | राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका

राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका

Next

पुणे : ‘‘कोणत्याही आपत्तीकाळात झोकून देऊन काम करण्याचा सरकारी यंत्रणेचा इतिहास आहे. यंदा महापुरात मात्र सरकारचे अस्तित्व दिसत नव्हते. राज्याचा प्रमुख हलला, तरच सरकारी यंत्रणा हलते,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री व सरकारी यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली. पुराच्या विषयात राजकारण नको, असे म्हणत त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मदतकार्य सुरू करण्याचे आवाहनही केले.

गुरुवारी (दि. ८) पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘अलमट्टी धरणाच्या संदर्भात दोन राज्यांच्या प्रमुखांमध्ये संवादाचा अभाव दिसतो आहे. पुराच्या विषयात राजकारण करायचे नाही, मात्र सरकारी यंत्रणा या काळात अस्तित्वहीन दिसत होती.
राज्याचा प्रमुख संकटाकडे किती गंभीरपणे पाहतो यावर सरकारी यंत्रणेची हालचाल होते. तसे या काळात दिसले नाही.’’ या विषयावर अधिक बोलणे टाळत पवारांनी सरकारने तत्परतेने पुढे येऊन मदतीचे काम सुरू करणे गरजेचे आहे, असे सांगितले. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने तातडीने १०० टक्के कर्जमाफी द्यावी. नागरिकांना दिलासा द्यावा असे ते म्हणाले.

शिवस्वराज्य यात्रा स्थगित
पक्षाची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करत असल्याची घोषणा पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देतील, असे सांगत पवारांनी पक्षाकडून लगेचच ५० लाख रूपये देत असल्याचे जाहीर केले.
कोल्हापूर, सांगली परिसरावर अभुतपूर्व संकट आले आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे. मदतीचा हात देण्यात सरकारने कमी पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने पूरग्रस्त भागात जाऊन वैद्यकीय मदत सुरु केल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांचे मत म्हणजे ‘राष्ट्रवादी’चे नव्हे!
काश्मिरबाबतचे ३७० कलम रद्द करण्याच्या विषयावर काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीतही मतभेद आहेत का, यावर पवार म्हणाले, ‘‘हा राष्ट्रीय विषय आहे, त्यावर राज्यातील पदाधिकाऱ्यांनी काही मत व्यक्त केले असेल तर ते पक्षाचे मत आहे असे मी समजत नाही.’’ महापुराबाबत बोलणार असल्याचे सांगत पवारांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Web Title: If the head of the state is moved, then the system will move!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.