हृदय रुग्णांना स्वस्तात स्टेंट दिले नाही तर रुग्णालयांवर कारवाई

By admin | Published: February 17, 2017 07:05 PM2017-02-17T19:05:38+5:302017-02-17T19:05:38+5:30

देशात सुमारे सहा कोटी लोकांना हृदयविकार असून दरवर्षी पाच लाख हृदयशस्त्रक्रिया होतात, हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारने या रुग्णांसाठीच्या स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत.

If heart patients are not given cheap stent, then take action on hospitals | हृदय रुग्णांना स्वस्तात स्टेंट दिले नाही तर रुग्णालयांवर कारवाई

हृदय रुग्णांना स्वस्तात स्टेंट दिले नाही तर रुग्णालयांवर कारवाई

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - देशात सुमारे सहा कोटी लोकांना हृदयविकार असून दरवर्षी पाच लाख हृदयशस्त्रक्रिया होतात, हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारने या रुग्णांसाठीच्या स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत. रुग्णालयांनी रुग्णांना स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून दिले नाहीत तर सरकार या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करेल व त्यांचा परवानाही रद्द करेल, असा इशारा केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिला.
अनंतकुमार मुंबई भारतीय जनता पार्टी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
अनंतकुमार यांनी सांगितले की, लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षात १४५० औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या असून त्यामुळे रुग्णांची पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने हृदय उपचारासाठी गरजेच्या असलेल्या स्टेंटच्या किंमतींवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे पंचेचाळीस हजार ते साठ हजार रुपयांना मिळणारा स्टेंट साडेसात हजार रुपयांना मिळेल तर दोन लाख रुपयांचा वेगळ्या प्रकारचा स्टेंट तीस हजार रुपयांना मिळेल. रुग्णालयांनी स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यांनी स्टेंटची जादा किंमत आकारली तर वाढीव रक्कम वसूल करणे, फौजदारी कारवाई करणे व रुग्णालयाचा परवाना रद्द करणे या उपायांचा अवलंब सरकार करेल.
ते म्हणाले की, स्टेंटची आयात अथवा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांच्या प्रमाणातील आयात अथवा निर्मिती पुढील एक वर्ष चालू ठेवणे आवश्यक आहे. किंमत कमी झाली म्हणून आयात अथवा निर्मिती थांबवली तर त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल.
राज्यात जनतेला स्वस्तात औषधे मिळावीत यासाठी जेनेरिक औषधांची एक हजार दुकाने सुरू करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. प्लॅस्टिक उद्योग व रसायन उद्योगाला मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ मिळावे व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात प्लॅस्टिक व रसायनशास्त्राच्या प्रगत शिक्षण संस्था सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी होती तशीच भाजपाच्या बाजूची लाट आपल्याला मुंबईत दिसत असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनता भाजपाला स्पष्ट बहुमताने विजयी करेल.
 

Web Title: If heart patients are not given cheap stent, then take action on hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.