मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:59 AM2024-08-05T07:59:04+5:302024-08-05T07:59:24+5:30

Manoj Jarange Patil on Election: मनोज जरांगे : पाडायचे की लढायचे हे २९ ऑगस्टला ठरणार 

If I threaten, there is nowhere to go; Manoj Jarange Patil's warning to Narayan Rane | मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना) : सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. जे उमेदवार असतील, त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी. पाडायचे की लढायचे, हे २९ ऑगस्टला ठरणार आहे. आम्ही राज्यातल्या २८८ जागा लढण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांसंदर्भात जरांगे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही.

नारायण राणे यांना इशारा
खा. नारायण राणे यांनी जरांगेंना शनिवारी आव्हान दिले. यावर जरांगे म्हणाले की, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये, असे आपण कधी बोललेलो नाही. निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही.

एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते - आंबेडकर
मानोरा (जि. वाशिम) : लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना यांची युती संपुष्टात आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीदरम्यान ही युती पुन्हा जुळणार नाही. एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते, असे सांगून युतीचा विषय येथेच संपला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

रविवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचे ताट वेगळे कसे ठेवायचे, याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा हा फॉर्म्युला आम्ही कोणालाही देणार नाही. आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीनी मराठा, कुणबी सोडून फक्त्त ओबीसींच्या उमेदवारास मतदान करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करू नयेत - अशोक चव्हाण 
नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पोहरादेवी येथील सभेत कुणबी आणि मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावर, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीजातीत, समाजात विशेषतः मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचे काम करू नये. मराठा समाज एकत्र आहे; परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब होण्याचे काम होत असेल तर ते बरोबर नाही. जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे.

Web Title: If I threaten, there is nowhere to go; Manoj Jarange Patil's warning to Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.