...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:23 AM2023-03-03T06:23:45+5:302023-03-03T06:24:32+5:30
खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विरोधकांनी हक्कभंगाची सूचना दिल्यानंतर आता हा हक्कभंग स्वीकारला जाणार का, या चर्चेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खुलासा करीत पूर्णविराम दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे किंवा विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही बोललेलो नाही, तर दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिक यांना देशद्रोही संबोधले, असा खुलासा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर तो मी ५० वेळा करीन, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे, अशा शब्दांत विरोधकांना चितपट केले.
खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी विरोधकांकडून हक्कभंगावर खुलासा हा समितीकडे होऊ शकतो सभागृहात नाही, असा आक्षेप नोंदवला. यावर उपसभापतींनी हा आपला अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. त्यानंतर शिंदे यांनी आपले म्हणणे सभागृहात मांडले.
‘ते’ वक्तव्य मलिकांबाबत
nमाझे देशद्रोह्यांबद्दलचे वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते.
nमलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे कुख्यात गुंड व देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्याशी संबंध होते.
nदाऊदची बहीण हसीनासोबत त्यांनी जमीन आणि गाळे खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
nहसीनाचा ड्रायव्हर सरदार खान ज्याला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती त्याच्याकडूनही मलिक यांनी जमीन घेतली. यामुळेच त्यांना अटक झाली असून, जामीन देखील झालेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मलिकांविरोधातील आरोप सिद्ध नाहीत - विरोधक
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, मलिकांसोबत स्वत: मुख्यमंत्री मंत्रिमंडळात होते, ही बाब विरोधकांनी निदर्शनास आणली.
हक्कभंग अजून स्वीकारला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्यांच्याविषयीचा हक्कभंग मी स्वीकारलेला नाही. त्यामुळे तो हक्कभंग समितीसमोर पाठवायचा की नाही त्यावर मी निर्णय घेईन, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांसोबतचे चहापान टळले, असे म्हटले आहे पण त्यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावले होते का? समजा विरोधक जर चहापानाला आले असते तर त्यांना देशद्रोही म्हटले गेले होते, मग अशा लोकांसोबत मुख्यमंत्र्यांनी चहापान घेतले असते का?
- उद्धव ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख