'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती, शिवसेना फक्त त्यांनाच कळाली'- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 11:58 AM2021-12-12T11:58:41+5:302021-12-12T12:01:31+5:30
'शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच माहित होतं. त्यांच्यासारखा नेता आज भाजपमध्ये नाही.'
मुंबईः आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त अनेक नेते त्यांना आदरांजली वाहत आहेत. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, गोपीनाथ मुंडे असते तर भाजप-शिवसेना युती तुटली नसती, अस म्हणाले आहेत.
शिवसेना फक्त गोपीनाथ मुंडेंनाच कळली
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं ते म्हणाले.
यशवंतरावानंतर शरद पवार...
राऊत पुढे म्हणाले, शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता. 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत.