लोकसभा एकत्र न लढल्यास सेनेच्या नाराजांना भाजपात घेणार
By अतुल कुलकर्णी | Published: June 23, 2018 05:51 AM2018-06-23T05:51:08+5:302018-06-23T05:52:11+5:30
लोकसभा निवडणुका भाजपा, शिवसेनेने एकत्रित लढवाव्यात यासाठी केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांचा टोकाचा आग्रह आहे. त्याचवेळी शिवसेनेतील नाराजांशी पडद्याआड गुपचूप संपर्क अभियान राबवणे चालूच ठेवा, अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : लोकसभा निवडणुका भाजपा, शिवसेनेने एकत्रित लढवाव्यात यासाठी केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांचा टोकाचा आग्रह आहे. त्याचवेळी शिवसेनेतील नाराजांशी पडद्याआड गुपचूप संपर्क अभियान राबवणे चालूच ठेवा, अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेने एकत्र लढण्यास स्पष्ट नकार दिलाच तर याच नाराजांना जाहीरपणे भाजपात प्रवेश दिला जाईल, अशी रणनीती भाजपाने आखली आहे.
भाजपाच्या एक ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितले की, दिल्लीहून शिवसेनेशी जरा सबुरीने घेण्याच्या सूचना आहेत. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर येऊन गेले. महूसलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानेही सेनेशी जोडून घेण्याची येत आहेत. पण वरवर हे प्रेमाचे भरते आलेले दिसत असले तरी पडद्याआड शिवसेनेच्या नाराज आमदारांना भाजपात घेतले तर त्या त्या मतदारसंघात पक्षाची समिकरणे काय होतील याचाही ‘अभ्यास’ भाजपाने पूर्ण करत आणला आहे.
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शिवसेना नाराजांची संख्या मोठी आहे. त्यातले अनेक जण पर्याय नव्हता म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले. ते शिवसेना सोडून जात असतील तर त्यांची पहिली पसंती भाजपा असावी यासाठी आत्तापासून भाजपाने बोलणीही सुरू केली आहे. शिवसेना लोकसभेत सोबत आली तर या नाराजांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे दरवाजे उघडायचे, मात्र जर लोकसभेला शिवसेनेला सोबत येण्यास नकार दिला तर लोकसभेच्या आधीच या नाराजांना भाजपात घेतले जाईल, असेही तो नेता म्हणाला.
दरम्यान शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचे वृत्त लोकमतमध्ये आल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी संशयाची सुई पश्चिम महाराष्ट्रातल्या सेना आमदारांकडे वळवली आहे. त्यांना चुचकारण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले असून नागपूरचे अधिवेशन संपले की त्यातील काहींना मंत्रीपदे देण्याचे नवे गाजर त्यांच्यापुढे धरण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्यांना भाजपाने आधी नीट सांभाळावे. त्यातलेच कितीतरी आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आमच्या घरात नाक खुपसण्यापेक्षा स्वत:चे घर नीट करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
>दिल्लीकडून सूचना मिळाल्याने तलवारी केल्या म्यान
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी २२ भाजपाकडे व १८ सेनेकडे अशा एकूण ४० जागा युतीकडे आहेत. राजू शेट्टींनी भाजपाची साथ सोडली तर राष्ट्रवादीच्या ५ व काँग्रेसच्या २ जागा आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेना सोबत न आल्यास भाजपाला निवडणुकीच्या आधीच मोठा फटका बसेल. त्यामुळे काहीही करुन सेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. सेनेला ‘डिस्टर्ब’ करु नका, अशा स्पष्ट सूचना दिल्लीने दिल्याने भाजपा नेत्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत.