महाराष्ट्राला मदत हवी तर ‘अडचण’ नको
By admin | Published: October 6, 2014 05:27 AM2014-10-06T05:27:06+5:302014-10-06T05:27:06+5:30
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून काही मदत हवी असेल तर मला कोणतीही ‘अडचण’ नको, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यात केले
मुंबई : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून काही मदत हवी असेल तर मला कोणतीही ‘अडचण’ नको, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यात केले. ‘अडचण’ या शब्दामध्ये मोदींना ‘बिगर भाजपा’ सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसवू नका, असे सुचवायचे आहे. प्रजासत्ताक भारतात वेगवेगळ््या राज्यांमध्ये वेगवेगळ््या पक्षांची सरकारे असली तरी केंद्र सरकारने सापत्न वागणूक देऊ नये, हे अभिप्रेत आहे व तशी पक्षपात न करण्याची शपथ पंतप्रधान घेतात. त्यामुळे ‘अडचण’ हा शब्द ही मोदींचा हा गर्भींत इशारा असेल तर त्यामुळे त्यांचीच अडचण होऊ शकते.
केंद्रात एका पक्षाचे सरकार असो की आघाडीचे, मात्र राज्य सरकारांना निधी मंजूर करताना तेथे कुठल्या पक्षाचे सरकार आहे व ते केंद्र सरकारच्या विचारधारेशी मिळत्याजुळत्या विचारसरणीचे आहे किंवा कसे याचा विचार करून मदत दिली जात नाही. शिवाय केंद्र सरकार राज्य सरकारांना जेव्हा निधी देते तेव्हा उपकार करीत नाही.
राज्यांमधून गोळा होणाऱ्या वेगवेगळ््या करांच्या रकमेतून केंद्र सरकार राज्यांना निधी देते. महाराष्ट्रातून दरवर्षी ८० हजार कोटी रुपये आयकरातून जमा होतात. महाराष्ट्रातून जेवढा पैसा कररूपाने जमा होतो त्या तुलनेत फारच कमी रक्कम महाराष्ट्राला मिळत असल्याची तक्रार शिवसेनेपासून अनेक पक्ष करीत असताना थेट पंतप्रधानांनी आपल्या पक्षाचे सरकार आणा तरच मदत मिळेल, असा गर्भीत इशारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान व मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली जाते तेव्हा कुणाबरोबर पक्षपात करणार नाही, अशी शपथ घेतली जाते. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळण्यात ‘अडचण’ नको हे मोदी यांचे विधान म्हणजे पक्षपात न करण्याच्या शपथेचा भंग आहे, हे मोदींना ज्ञात नसावे का, असा सवाल उपस्थित होतो. (विशेष प्रतिनिधी)