"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 15, 2021 01:46 PM2021-01-15T13:46:37+5:302021-01-15T14:00:14+5:30
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे.
पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा हे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे मत व्यक्त करत पक्षप्रमुख म्हणून यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका जाहीर केली आहे. भाजप मात्र मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिकेत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु तरीदेखील हे प्रकरण बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याची माहिती समोर येत आहे.मात्र या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. जर हा माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता असे म्हणत एकप्रकारे धनंजय मुंडे यांचे समर्थन देखील रोहित पवार यांनी यावेळी केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री व प्रवक्ते नवाब मलिक यांनी याआधीच मुंडे यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना तूर्तास दिलासा...
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. या कोअर कमिटीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मात्र तूर्तास तरी मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला रेणू शर्मा यांनी भाजप व मनसेचे नेते यांच्यांशी पण संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिस रेणू शर्मा व मुंडेंचा जबाब नोंदविणार आहेत.त्यामुळे एकूणच हा प्रकार संशयास्पद असल्याने राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत तूर्तास राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.