मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:20 PM2023-07-09T18:20:21+5:302023-07-09T18:21:19+5:30
२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ते पोहरादेवीच्या दर्शनाला वाशिमला गेले होते.
आजची ही जाहीर सभा नाहीय. मला इथले लोक भेटायला आले होते. त्यांना मी म्हटले पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहे. जाहीर सभा नाही तर कार्यकर्त्यांशी बोलायचे आहे. आज गर्दी पाहून निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते. भाजपाने आमच्यावर टीका केली. पहिले निष्ठावंत आता कुठल्या सतरंजीखाली सापडतायत ते पहावे. अनेकांना भाजपा रुजवला आणि वाढविला. आज त्यांच्यासारखी निष्ठावंत माणसे आहेत त्यांची काय अवस्था झालीय. सगळे बाजार बुनगे येतायत, भ्रष्टाचाराने बरबटलेले येतायत आणि त्यांच्या सतरंज्या हे निष्ठावंत उचलतायत. राजकारण म्हटले की फोडाफोडीचे असते. भुजबळ आमच्याकडे होते, राष्ट्रवादीत गेले आता तिकडे गेले. आता पक्ष फोडायला सुरुवात झाले आहे. मतातून सरकार येत होते. आता खोक्यातून येत आहे. माझा कारभार वाईट होता, तर जनता मला घरी बसवेल. परंतू तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून बाजुला केले. ते जाऊद्या, जर तुमचे सरकार १६५ आमदारांचे होते, तर राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना का फोडले असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
अमित शहा यांनी अडीच वर्षे आमची अडीच वर्षे शिवसेनेचा असे म्हणालेले. म्हणून आम्ही युती केली. ते झाले असते तर आज तुमचा मुख्यमंत्री असला असता. सध्या महागाईने वेढले आहे. जेव्हा ही चर्चा सुरु होते, तेव्हा हे काहीतरी टुम काढतात आणि आपण लढत राहतो. आता समान नागरी कायदा आणताय, आम्ही काश्मीरमधील ३७० कलमावर पाठिंबा दिलाच होता. परंतू अखंड देशात एकच पक्ष असला पाहिजे या भुमिकेला आमचा विरोध असेल. सबका मालिक एक, या भावनेने हे लोक पक्ष ताब्यात घेत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला.
माझ्या राज्यात प्रजा संकटात असेल तर मुख्यमंत्री म्हणून धावून नाही गेले तरी चालतील परंतू समस्या सोडविली पाहिजे. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. चार दिवसांनी एक गट आम्हीच राष्ट्रवादी म्हणत त्यांच्यासोबत गेला आहे. आता याच राष्ट्रवादींसोबत मोदींचा फोटो येणार आहे. हे भोपाळमध्ये बोलतात, पण मणिपूरवर एक शब्द जरी बोलला का? असा आरोप ठाकरे यांनी केला.
मी मणिपूर शांत करायचे असेल तर एक तोडगा सांगतो. विरोधी पक्षनेत्यांच्या घरावर नेत्यांवर ईडी सीबीआयच्या धाडी टाकता ना त्या ईडी सीबीआय आयकर विभागाला मणिपूरला पाठवा. एकदा का धाडी पडल्या की ते लोक तुमच्या पक्षात येतील आणि मणिपूर शांत होऊन जाईल, प्रश्न संपेल. आमदार गेले, खासदार गेले, जाऊद्या. ते गेले तरी चालतील कारण दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असे ठाकरे म्हणाले.