आरक्षण द्या नाही तर मराठा पुन्हा इतिहास घडवेल, रणरागिणींचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 03:06 PM2016-10-23T15:06:57+5:302016-10-23T16:09:56+5:30

जिल्ह्यात आज मराठ्यांची न भूतो न भविष्यती अशी एकजूट पाहायला मिळाली आहे.

If Maratha does not give reservation, then the Maratha will make history again, Ranaragini's Elgar | आरक्षण द्या नाही तर मराठा पुन्हा इतिहास घडवेल, रणरागिणींचा एल्गार

आरक्षण द्या नाही तर मराठा पुन्हा इतिहास घडवेल, रणरागिणींचा एल्गार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 23 - जिल्ह्यात आज मराठ्यांची न भूतो न भविष्यती अशी एकजूट पाहायला मिळाली. लाखोंच्या उपस्थितीत ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला. जिगिशा सावंत, रुपाली परब, रसिका राणे, विमल माजिक, गायत्री सावंत, ऋतुजा मर्गज यांनी या मोर्च्याला संबोधित केले. मराठ्यांनी आजपर्यंत इतिहास घडविला, आम्हाला डिवचू नका. न्याय हक्कासाठी आता चर्चा खूप झाल्या. देणार तर द्या नाही तर मराठा पुन्हा एकदा इतिहास घडवेल, रणरागिणींच्या या भाषणानं मराठा मोर्चा अक्षरशः दणाणून गेला.
यावेळी सिद्धी सावंत, पिया गवस, अदिती जाधव, सायली सावंत, वृषाली सावंत, मंगल राणे, राधा सावंत या रणरागिणींनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन दिलं. कोपर्डी अत्याचाराचा निषेध, मराठा आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी न भूतो, न भविष्यती ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक मोडणारा मूक मोर्चा रविवारी सिंधुदुर्गनगरीत सकल मराठा समाजाने काढला. कडक उन्ह असतानाही अवघा मराठा समाज या मोर्चासाठी एकवटला होता. सिंधुदुर्गच्या मराठा समाजाचा हा मोर्चा अडीच ते तीन लाखांच्या घरात पोहोचला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्गात मोर्चासाठी मराठा समाजातील आया बहिणींसह जनसमुदाय येत होता. मी मराठा असे शब्द लिहिलेल्या भगव्या टोप्या, हातात मराठा क्रांतीचे निशाण असलेले भगवे ध्वज, त्या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची छबी अशा दिमाखदार वातावरणाने रविवारची सकाळ मराठामय होऊन गेली होती.
सकाळी बरोबर 10.40 वाजता ओरोस फाटा येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला तन्वी कदम, सानिया सावंत, यशिका परब, पुजा सावंत, प्राची कोकितकर मराठा भगिनींनी पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. नजर स्थिरावरणार नाही अशा अद्भुत, चमत्कारी आणि अभूतपूर्व सकल मराठा क्रांतीने रविवारी इतिहासच घडविला. अन्याय अत्याचाराबरोबर आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणामुळे पेटून उठलेला मराठा समाज रस्त्यावर उतरला. यापुढे आता हे सहन करणार नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही असा वज्र निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला.


मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नंतर नजीक असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानामध्ये गोळा झाला. या मैदानात 1 लाख 60 हजारांपर्यंत मोर्चेकरी सामावले होते. मोर्चातील जनसमुदायास सूचना देण्याकरीता सिंधुदुर्गनगरी येथील चार ते पाच किलोमीटर परिघात ध्वनीक्षेपकांची सोय केली होती. त्याद्वारे मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यात येत होत्या. त्यांचे काटेकोर पालन केले जात होते. अत्यंत शिस्तबद्धरित्या निघालेल्या या मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचालकांकडून जेव्हा राष्ट्रगीत होणार असल्याची उद्घोषणा झाली तेव्हा काही मिनिटे सारी सिंधुदुर्गनगरी नि:शब्द आणि स्तब्ध झाली. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतरचा क्षण अनुभवताना अंगावर शहारे आले आणि जणू सारी सिंधुदुर्गनगरी लाखो लोकांच्या मुखातून जन-गण-मन हे गीत गात होती.
मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील मेगाब्लॉकमुळे हजारो मराठा बांधव, भगिनींना माघारी परतावे लागले. हजारो मराठा बांधव ट्रॅफिकमुळे तिथल्या तिथेच अडकल्यानं मोर्चास्थळी पोहोचू शकले नाहीत. वाहतूक कोंडी सोडविणारी पोलिसांची वाहतूक यंत्रणाच कोलमडली.



दरम्यान मराठा क्रांती मोर्च्यात राजकीय नेत्यांनीही सहभाग नोंदवला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राजन तेली, प्रमोद जठार, युवानेते संदेश पारकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार, अमित साटम, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रवीण भोसले, शिवराम दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सतीश सावंत, सुरेश दळवी आदींनी उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे लहान मुलांसह आबालवृद्ध मोर्चात सहभागी झाले होते. 

 

(छाया : विनोद परब)

Web Title: If Maratha does not give reservation, then the Maratha will make history again, Ranaragini's Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.