...तर महापौर राजीनामा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 01:33 AM2016-10-28T01:33:27+5:302016-10-28T01:33:27+5:30
अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, बदली न केल्यास शासनाच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा इशारा नवी मुंबईचे
नवी मुंबई : अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, बदली न केल्यास शासनाच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा इशारा नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिला आहे.
महापौर सोनावणे यांनी आयुक्तांच्या विरोधात ठाम भूमिका घेत अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन करू नये, असे
पत्रच त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी शहरभर आंदोलन उभारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्त प्रामाणिकपणाचा व भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा दिखावा करून दिशाभूल करत आहेत. पण त्यांना नागरिकांचे समर्थन नाही. शासनाने लोकभावनेचा आदर करून, त्यांना तत्काळ पदमुक्त केले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंंढे यांच्यावर विश्वास दाखविल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर खरोखर विश्वास असेल तर नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी. पण प्रामाणिकपणाच्या नावाखाली आमच्यावर हेकेखोर अधिकारी लादू नये, अशी विनंती महापौर सोनावणे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)