“मनसे महायुतीत येणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे”; श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 01:05 PM2024-04-09T13:05:10+5:302024-04-09T13:05:22+5:30
MP Shrikant Shinde: समविचारी पक्ष एकत्र आले, लोक सकारात्मक पद्धतीने मतदान करतील, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
MP Shrikant Shinde: गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या भाजपा नेत्यांसोबतच्या गाठी-भेटी वाढल्या आहेत. मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचक विधान केले आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, मनसे महायुतीत येणार असेल तर आम्हाला आनंदच आहे, असे म्हटले आहे.
२०१४ मध्ये राज ठाकरे असे व्यक्ती होते, ज्यांनी जाहीरपणे भूमिका घेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे, असे म्हटले होते. राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहतील. राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा असेल. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मनसे महायुतीत येणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे
राज ठाकरेंनी महायुतीत यावे की नाही, हा वरिष्ठ पातळीवरील चर्चेचा विषय आहे. मी याविषयी भाष्य करणे योग्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वत: राज ठाकरे याबाबत चर्चा करतील. मात्र, मनसे जर महायुतीत येणार असेल, तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. कारण समविचारी पक्ष एकत्र आले, लोक सकारात्मक पद्धतीने मतदान करतील, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या १० वर्षांत ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी भारताचा विकास केला. एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली, हे आता त्यांनाही मान्य झाले असेल. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्याकरिता राष्ट्र प्रथम आहे, समाज प्रथम आहे, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहायला हवे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.