मोदींची जन्मकुंडली होती, तर सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?
By Admin | Published: February 12, 2017 07:40 PM2017-02-12T19:40:15+5:302017-02-12T19:40:15+5:30
पंतप्रधान मोदींची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबत सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ - पंतप्रधान मोदींची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबत सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?, असा खोचक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
विखे पाटील यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांचा दौरा केला. या प्रचार दौ-यामध्ये गल्ले बोरगाव आणि चिखलठाण येथे जाहीर सभा करताना त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजपा आणि शिवसेनेमधील भांडण म्हणजे केवळ सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांपासून घेतलेला यू-टर्न पाहता ही एक जुमलेबाज पार्टी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता लोकंही बीजेपी म्हणजे बडी जुमलेबाज पार्टी असल्याचे बोलू लागले आहेत. अशा लोकविरोधी पक्षाची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी ती तपासून घ्यायला हवी होती.
चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. सध्या सुरू असलेल्या स्वाभिमानाच्या गप्पा लक्षात घेता शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामे फेकायला गेले की काय, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु शिवसेनेने राजीनामे न देता शेतकरी कर्जमाफीची मागणी करणे म्हणजे निव्वळ बनवाबनवी होती. राज्यात आचारसंहिता लागू असताना कर्जमाफीचा निर्णय होणे शक्य नाही, हे न समजण्यासाठी जनता दुधखुळी नाही. मागील दोन वर्षांत शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात गप्प बसणारी शिवसेना आता आचारसंहितेच्या काळात कर्जमाफीची मागणी करते, हा स्टंट नव्हे तर आणखी काय आहे ?, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षनेते यांनी केली.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने तेथील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. परंतु याच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेल्या सात-बारा कोरा करण्याच्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. मागील दोन वर्षात महाराष्ट्रात सहा हजारांहून अधिक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या तरी येथील शेतक-यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात भाजप निर्णय घेत नाही. परंतु उत्तर प्रदेशची निवडणूक असल्यामुळे तेथील शेतक-यांना कर्जमाफीचे जाहीर आश्वासन दिले जाते, ही या राज्यातील शेतक-यांची मोठी फसवणूक आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतक-यांना दिलेला तो शब्दही भाजपाने पाळलेला नाही. निवडणूक आली की, मोठ-मोठी आश्वासने देण्याची सवय भाजप शिवसेनेला झाली आहे. बिहारच्या निवडणुकीपूर्वी तेथील मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. परंतु निवडणुकीनंतर भाजप सरकारने आंबेडकरांच्या स्मारकाची एक विटही रचलेली नाही, याकडे विखे पाटील यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी मोदींनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. हे सुद्धा मतदारांना भुरळ घालण्यासाठी केलेले काम आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्मारकांच्या भूमिपूजनाचे इव्हेंट करण्यासाठी मोदींना वेळ आहे. परंतु महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळ मिळू नये, हे दुर्दैव असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.