नाणार रिफायनरी विदर्भात आल्यास विकासाला गती मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:23 AM2018-05-05T05:23:32+5:302018-05-05T05:23:32+5:30
रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
नागपूर : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने विदर्भातील विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतले. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ विकासाला गती मिळेल, अशी भूमिका काहींनी मांडली.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक
नाणार प्रकल्प विदर्भात आल्यास विकासाला निश्चितच गती मिळेल. विदर्भात रोजगाराच्या संधी वाढतील. नाणार सोबत सरकारने टेक्सटाईल पार्क संदर्भातही तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.
- भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशिम
निश्चितच विकास होईल
पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात जिथे कुठे जागा उपलब्ध आहे. ती उभारण्यास विरोध नाही. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास निश्चितच विकासाला गती मिळेल.
- अॅड.शिवाजीराव मोघे,
माजी मंत्री
रोजगाराच्या संधी वाढतील
विदर्भात उद्योग याव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेच. नाणार रिफायनरी येथे आल्यास स्वागतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील. यासोबतच ट्रान्सपोर्ट रेट कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.
- विकास कुंभारे,
आमदार मध्य नागपूर
स्थानिक लोकांना रोजगार मिळावा
विदर्भात प्रकल्प आलेच पाहिजे. कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे आहे. यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. विदर्भात रिफायनरी स्थापन झाल्यास आनंदच होईल.
- वीरेंद्र जगताप,
आमदार, चांदूर रेल्वे
रिफायनरी गोंदियात आणा
पेट्रोल रिफायनरी गोंदिया जिल्ह्यात स्थापना झाल्यास विदर्भाचा विकास होईल. येथील बेरोजगारांना रोजगार मिळतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.
- विजय रहांगडाले,
आमदार, तिरोडा
विदर्भासाठी संधी
विदर्भात मोठ्या उद्योगांची संख्या कमी आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. नाणारची प्रस्तावित रिफायनरी विदर्भात स्थापन झाल्यास वैदर्भीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.
- धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री
पेट्रोलचे भाव कमी होतील
नाणारचा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. पेट्रोलचे दर विदर्भात कमी होतील. या एका प्रकल्पापाठोपाठ इतर उद्योगही विदर्भात येतील.
- प्रा.राजू तोडसाम,
आमदार आर्णी-केळापूर
तरुणांना रोजगाराच्या संधी
विदर्भात पेट्रोलचे दर जास्त आहे. इतकेच काय बेरोजगारांची संख्याही इथे अधिक आहे. अशात सरकार जर नाणारची प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात स्थापन करीत असेल अधिक चांगले होईल.
- रवि राणा, आमदार, बडनेरा
विदर्भाचा फायदाच होईल
नाणारची पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात आल्यास निश्चितच काही प्रमाणात अनुशेष कमी होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळतील.
- संजय पुराम आमदार, आमगाव-देवरी
महसूल वाढेल
विदर्भात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन केल्यास स्वागतच आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धल होतील. यासोबतच सरकारच्या महसुली उपत्नात वाढही होईल. यासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे.
- डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार