नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
By हेमंत बावकर | Published: April 29, 2024 12:41 PM2024-04-29T12:41:52+5:302024-04-29T12:46:53+5:30
Narayan Rane News: विधानसभेला राणेंचा पराभव जिव्हारी लागलेल्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच मतदारसंघातील कट्टर समर्थकाने शपथ घेतली.
तळकोकणात नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली आणि जवळपास एका बाजुला झुकलेली लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. गेल्या काही वर्षांपासून मुलांना राजकारणात आणल्याने व विविध जबाबदाऱ्यांमुळे नारायण राणेंचे सिंधुदूर्ग-रत्नागिरी मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले होते. आता राणे स्वत: गावे फिरत असून तेथील महत्वाच्या लोकांच्या गाठी-भेटी घेत आहेत. याचा परिणाम मतदानावर होण्याचा दावा राणे समर्थक करत आहेत.
अशातच कुडाळच्या एका कट्टर राणे समर्थकाने शपथ घेतली आहे. नारायण राणे जवळपास एक लाख मतांच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा दावा बंड्या उर्फ निलेश शिरसाट यांनी केला आहे. तसेच जर नारायण राणे पडले तर आयुष्यात पुन्हा कोणाचाही प्रचार करणार नाही, अशी शपथ देखील शिरसाट यांनी घेतली आहे. विधानसभेला राणेंचा पराभव जिव्हारी लागलेल्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाचे म्हणजे कुडाळ मालवण या मतदारसंघात २०१४ मध्ये नारायण राणेंचा सुमारे १० हजार मतांनी पराभव झाला होता. ठाकरे गट शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा पराभव केला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत २००९ मध्ये नाईक यांचा राणेंनी सुमारे ३५ हजार मतांनी पराभव केला होता. यानंतरच्या पाच वर्षात या मतदारसंघात असे काही वासे फिरले की राणेंची आधीची ३५००० मते आणि २०१४ मध्ये नाईक यांना पडलेली जादाची १०००० मते अशी ४५ हजार मते नारायण राणेंच्या विरोधात गेली. यानंतर राणेंनी पुन्हा कधीच निवडणूक लढविणार नाही अशी शपथ घेतलेली. आज हेच राणे पुन्हा निवडणुकीला उभे राहिले आहेत.
अशातच सिंधुदूर्गात प्रचाराला वेग आला आहे. उष्णतेच्या झळा वाढलेल्या असताना राजकीय वातावरणही तापलेले आहे. कार्यकर्ते, मित्रपरिवारात चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. जिथे बंडाचे वारे सुरु झालेले त्या दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ लीड देणार की जिथे नारायण राणेंसारखा मातब्बर नेता हरलेला तो कुडाळ मालवण लीड देणार अशीही चर्चा होत आहे. या दोन मतदारसंघांसह कणकवली मतदारसंघाने जर राणेंना लीड मिळवून दिली तर त्यांना ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना हॅट्रीकपासून रोखणे सोपे जाणार आहे. यासाठी कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.