मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन; शिवसेना आमदाराचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 12:41 PM2024-01-11T12:41:34+5:302024-01-11T12:42:53+5:30
वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती यामुळे संतोष बांगर नेहमी विरोधकांच्या टार्गेटवर राहिले आहेत.
हिंगोली - शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. मोदी पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईन असं धक्कादायक विधान बांगर यांनी केले आहे.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या विधानांसाठी चर्चेत असतात. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर संतोष बांगर म्हणाले की, आज सर्वसामान्यांच्या घरात लोकांना माहिती आहे आपल्याला शिवेसना-भाजपालाच निवडून द्यायचे आहे. मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहे. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
संतोष बांगर यांची विधाने कायम चॅलेंज देणारी असतात. गेल्या वर्षी हिंगोली बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या त्यात कळमनुरी बाजार समितीत १७ पैकी १७ जागा निवडून न आल्यास मिशी ठेवणार नाही अशी वल्गना आमदार संतोष बांगर यांनी केली होती. त्यावेळी बांगर यांच्या नेतृत्वातील पॅनेलने अवघ्या ५ जागा जिंकल्या त्यातही शिंदे गटाच्या ३ जागा होत्या. तर महाविकास आघाडीने १२ जागांवर विजय मिळवला होता. बांगर यांनी निवडणुकीपूर्वी केलेले विधान तेव्हा सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले. अनेकांनी आता तुम्ही मिशी कधी काढणार असं विचारून त्यांना डिवचत होते.
वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती यामुळे संतोष बांगर नेहमी विरोधकांच्या टार्गेटवर राहिले आहेत. कधी मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ तर कधी कुणा कर्मचाऱ्याला मारहाण अशा विविध घटनांनी बांगर चर्चेत येतात. विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने संतोष बांगर यांनी मोर्चा काढत गद्दारांविरोधात जोरदार भाषण केले होते. त्यानंतर ज्यावेळी विधानभवनात शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यादिवशी सकाळी बांगर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.