नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर जाळून टाका - राज ठाकरे
By admin | Published: March 9, 2016 09:16 PM2016-03-09T21:16:18+5:302016-03-09T22:13:43+5:30
नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर, चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरवा आणि रिक्षा जाळून टाका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर, चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरवा आणि त्या रिक्षा जाळून टाका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या १० व्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना मनसे कार्यकर्त्यांना दिले.
व्यावसायिक राहुल बजाज यांच्या कारखान्यात ७० हजार रिक्षा तयार आहेत. या रिक्षांच्या विक्रीसाठी ७० हजारे परवाने देण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा संपूर्ण व्यवहार ११९० कोटींचा आहे असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
रिक्षा चालकांना ७० हजार परवान्यांचे वाटप करण्याची इतकी घाई कशाला? ७० हजार परवान्यांमध्ये ७० टक्के परवाने परप्रांतीयांना देणार आहेत. सर्वच्या सर्व ७० हजार परवाने मराठी मुलांना का नाहीत ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
७० हजार रिक्षा रस्त्यावर आल्या तर, पार्क कुठे करणार ? रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती देणा-या नागपूरच्या न्यायाधीशांच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी टिका केली. सरकारी व्यवस्था असताना न्यायाधीश कसे निर्णय देतात ? न्यायापालिकेचा आदर टिकेल अस वागा असे राज ठाकरे न्यायाधीशांना उद्देशून म्हणाले.
जे काँग्रेसच्या राजवटीत सुरु होत तेच आताही सुरु आहे असे सांगत त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर टिका केली. बँकांचे पैसे बुडवल्यानंतर बँका सर्वसामान्यांच्या मागे लागतात मग इतक मोठा विजय मल्ल्या बँकांचे पैसे बुडवून कसा पळून गेला ? असा सवाल राज यांनी केला.
येत्या आठ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होमपीचवर म्हणजेच शिवतीर्थावर सर्वच विषयांवर भरभरुन बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले. राजकीय नेते आणि पक्षाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. लता मंगेशकरांचा अपवाद सोडला तर अनेक मोठया माणसांना उतरता काळ पहावा लागला आहे असे राज म्हणाले. यापुढची वाटचाल खडतर असली तरी, ठाम असेल असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
राहुल बजाज यांच्या ७० हजार रिक्षा तयार आहेत, एका रिक्षाची किंमत १ लाख ७० हजार रूपये, ७० हजार रिक्षांची किंमत होते ११९० कोटी रुपयांचा हा व्यवहार, हे कशासाठी - राज ठाकरे
नवीन परवाने दिलेल्या रिक्षा रस्त्यावर दिसल्या जाळून टाका.
राहुल बजाजांच्या रिक्षांसाठी रिक्षा परवाने देण्याचा निर्णय, ११९० कोटींचा व्यवहार - राज ठाकरेंचा आरोप.
रिक्षा चालकांच्या ७० हजार परवान्यांमध्ये ७०टक्के परवाने परप्रांतीयांना देणार.
रिक्षा परवाने देताना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावर स्थगिती देणा-या नागपूरच्या न्यायाधीशांवर राज ठाकरेंची टिका.
न्यायापालिकेचा आदर टिकेल अस वागा.
सरकार असताना, न्यायाधीश प्रत्येक निर्णय कशाला घेतात ?.
मनसेच्या आंदोलनामुळे हजारो खोटया रिक्षा, टॅक्सी पकडल्या गेल्या.
रिक्षाच परवाने परप्रांतीयांना नको, मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत.
काँग्रेसच्या राजवटीत सुरु असलेल्या गोष्टी आजही सुरुच आहेत.
बँकांचे हजारो कोटी बुडवणारे विजय मल्ल्या पळून कसे गेले.
घेतलेला वसा सोडू नका
मला जे आपल्याशी भरभरुन बोलायचय ते आठ एप्रिलला शिवतीर्थावर बोलायचय
आमदार, नगरसेवक येतात जातात, पक्ष तिथेच असतो, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचल पाहिजे, लोकांचे विषय हाती घेतले पाहिजेत
प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, लता मंगेशकर जगात एकमेव व्यक्ती असेल ज्यांनी आयुष्यात घसरण पाहिली नाही.
पक्षाच्या दहावर्षात चढ उतार आले ते चालूच रहातात
आपल्याला आपला पडदा वरती करायचा आहे, इतरांच्या पडद्याकडे लक्ष देऊ नका, याच्यापुढे चाक अडकणार नाही