तेव्हा जमले नाही तर...

By admin | Published: February 19, 2017 03:25 AM2017-02-19T03:25:10+5:302017-02-19T03:25:10+5:30

नि वडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘मुंबई महापालिकेत आम्ही फारशा जागा मिळवू शकणार नाही. तेथे शिवसेना सगळ््यात जास्त जागा मिळवणारा

If not gathered then ... | तेव्हा जमले नाही तर...

तेव्हा जमले नाही तर...

Next

(पंचनामा)
- अतुल कुलकर्णी

नि वडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘मुंबई महापालिकेत आम्ही फारशा जागा मिळवू शकणार नाही. तेथे शिवसेना सगळ््यात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरेल,’ असे विधान केले आहे. प्रचाराचे वातावरण शिगेला असताना, अशा वक्तव्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल की निराशा? पवारांच्या पत्रकार परिषदेतही हा विषय निघाला. आम्हाला मुंबईत कधीच स्पेस मिळाली नाही. कारण राष्ट्रवादीच्या जन्माच्याही आधी शिवसेना मुंबईत पाय रोवून होती आणि त्यांनी मराठी माणसांवर पकड मिळविली होती. त्यामुळे मराठी मते आम्हाला मिळाली नाहीत आणि अन्य भाषिक मते आमच्याकडे वळवून घेताना आम्हाला फारसे यश आले नाही, पण आम्ही आता त्याकडे विशेष लक्ष देणार आहोत, असे पवारांनी स्पष्ट केले.
मात्र, पवारांच्या या उत्तराने हा प्रश्न संपणारा नाही. अवघ्या दोन-अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाला आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवावीशी वाटते. त्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. मात्र, राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार तब्बल १५ वर्षे असताना त्यांना मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असे का वाटले नाही. राष्ट्रवादीला मुंबईत एवढ्या वर्षात स्वत:च्या पक्षासाठी एकही चेहरा का तयार करता आला नाही? राष्ट्रवादीचे सगळे नेते राज्यभरातून मुंबईत यायचे आणि शुक्रवार ते रविवार आपापल्या मतदार संघात परत जायचे. त्यामुळे त्यांना त्यांचा चेहरा मुंबईत तयार करता आला नाही. हे जर खरे असेल, तर मग मुंबईत स्थापन झालेली शिवसेना मुंबईबाहेर, अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कशी काय पोहोचली? त्यांचे कोणते नेते मुंबई बाहेरचे होते? या प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा पंचनाम्यात येणार नाहीत, पण शिवसेनेला मुंबईबाहेर जाऊन जे करता आले, ते राष्ट्रवादीला मुंबईत सत्तेच्या अग्रभागी राहून का करता आले नाही?
याचे उत्तर राजकारणात दडले आहे. शिवसेना मुंबईत वाढावी ही त्या वेळच्या काँग्रेसची गरज होती. त्यातून शिवसेनेला सुरुवातीच्या काळात काँग्रेसने वाढवले, पण पुढे बाळासाहेबांनी जोरदार वातावरण तयार केले आणि थेट विधानसभेवर भगवा फडकविण्याचीच घोषणा केली. १९९५ साली त्यांनी ते करूनही दाखवले, पण नंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेला ताकद देण्याचे काम केले. ही सगळी त्यांची राजकीय सोय होती. काँग्रेसचे याच मुंबईत २००९ साली १७ आमदार निवडून आणले होते. पुढे ते त्यांना टिकवता आले नाहीत, पण त्याच्या बरोबरीचे यशही राष्ट्रवादीला मुंबईत कधी मिळाले नाही. मुंबईत स्वत:चा चेहरा तयार व्हावा, म्हणून राष्ट्रवादीने कधीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. मुंबईचे पालकमंत्रिपद मिरवणाऱ्यांनी स्वत:च्या पलीकडे विचार केला नाही.
आता आम्ही मुंबईकडे लक्ष देणार आहोत, असे पवार म्हणत असले, तरी वेळ निघून गेलेली आहे. त्यात भर म्हणून की काय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहील आणि आम्ही मुंबईत फारसे नव्हतोच, त्यामुळे फार काही जागा आम्हाला मिळतील असे वाटत नाही, असे पवारांनी जाहीरपणे सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनेची भलामण करण्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही नवीनच काही सेटिंग तर नाही ना, असाही प्रश्न राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे मतदानाला दोन दिवस उरलेले असताना पडला आहे. राष्ट्रवादीला १५ वर्षांत शिवसेनेला बाजूला सारता आले नाही, ते आता भाजपाला अवघ्या दोन अडीच वर्षाच्या काळात साध्य करता येईल का? की जे त्यांना जमले नाही ते यांनाही जमणार नाही... २३ तारखेला यावरचा पडदा दूर होईल...

Web Title: If not gathered then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.