...तर निवडणूक लढवणार नाही - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:54 AM2018-02-27T02:54:37+5:302018-02-27T02:54:37+5:30
मी रविवारी एकटाच इस्लामपूरमध्ये काही काळ फिरलो. त्याची कोणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळे असले इशारे मी जुमानत नाही. मी येथे आलो नसतो तर पळ काढला असा अर्थ काढला गेला असता.
इस्लामपूर (जि. सांगली) : माझ्याच मतदारसंघात पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरण्याची वेळ येईल, त्या दिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिले. संघटनेच्या इस्लामपुरातील कार्यालयाची पाहणी करून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चहा-टपरीच्या कट्ट्यावर बसून चहापानही घेतले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इस्लामपूर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. शेट्टी यांनी या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. रयत आघाडीने शेट्टी यांना वाळवा तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला होता. त्याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले की,
मी रविवारी एकटाच इस्लामपूरमध्ये काही काळ फिरलो. त्याची कोणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळे असले इशारे मी जुमानत नाही. मी येथे आलो नसतो तर पळ काढला असा अर्थ काढला गेला असता. माझे कार्यकर्ते भिकारीही नाहीत आणि खंडणीबहाद्दरही नाहीत. ते कष्टकरी आहेत. त्यामुळे सर्व जण मिळून वर्गणी काढून संघटनेचे कार्यालय पुन्हा सुसज्ज करतील. त्यासाठी कोणाकडे काही मागण्याची गरज नाही.
आला रे आला.. वाघ आला!
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदार शेट्टी यांना वाळवा तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी हे इस्लामपुरात येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आला रे आला.. वाघ आला!’, ‘एकच गट्टी.. राजू शेट्टी!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.