‘पतंजली’चे उत्पादन बेकायदेशीर असेल तर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:32 AM2018-07-21T03:32:22+5:302018-07-21T03:32:37+5:30
‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले.
नागपूर : ‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले. बाबा रामदेव यांनी पुत्रजीवक बीज बाजारात आणून याच्यामुळे मुलगाच होईल असा दावा केला आहे. ही बाब नियमबाह्य असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय दत्त यांनी केली. ‘पतंजली’च्या उत्पादनाची चौकशी करू व बेकायदेशीरपणा आढळला तर कारवाई करू, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले.
संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्यातून ही बाब उपस्थित केली. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने पुत्रजीवक बीज हे उत्पादन विक्रीला आणले आहे. याचे सेवन केले तर मुलगा होईल असा दावा करण्यात येत आहे. देश व राज्यातील विविध नियमांचा सार्वजनिकपणे भंग होत आहे. त्यांच्या कंपनीला देशभरात जमिनी देण्यात येत आहेत. अक्षरश: सैराट होऊन शासन त्यांना खैरात देत आहे, असा आरोप करत शासन व बाबा रामदेव यांच्यावर टीका केली. गिरीश बापट यांनी यावर उत्तर देताना बाबा रामदेव यांचा उल्लेख परमपूज्य असा केला. यावरून विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. तुम्ही बाबांच्या तालावरच नाचा असा टोला दत्त यांनी मारला. मात्र बाबा रामदेव आमच्यासाठी पूज्यच आहेत. त्यांच्या कार्याची जगाने दखल घेतली. योगाला त्यांनी जगात पोहोचवले. त्यांच्या तालावर आम्ही नाचू व तुम्हालाही नाचवू, असे प्रतिपादन बापट यांनी केले. नियम सर्वांना सारखेच असतात. आम्ही ‘पतंजली’च्या संबंधित उत्पादनाची चौकशी करू व आवश्यकता वाटली तर कारवाई करू, असे बापट म्हणाले.