राज ठाकरेंनी आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देईन; गिरीश महाजन यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:54 PM2019-04-16T18:54:28+5:302019-04-16T19:00:45+5:30
गुजरातला पाणी जात असेल, असं राज ठाकरे यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असं खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
मुंबई : गुजरातला पाणी जात असेल, असं राज ठाकरे यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असं खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच नांदेडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी राज्यातील भाजपा सरकारनं महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिल्याचा आरोप केला होता. याबाबत न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंनी केलेले आरोप फेटावून लावत म्हणाले, 'गुजरातला पाणी जात असेल, असं राज ठाकरे यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन.'
याचबरोबर, 'नुसतं बोलून चालणार नाही, तर स्वत:चं कर्तृव्य सिद्ध करुन दाखवलं पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या. क्लिप दाखवायच्या, तोडून-मोडून मोदींच्या काहीतरी आणि दोन शब्द बोलायचं. असं करण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणून दाखवा.' अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसऱ्याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय ते. दुकानदारी बंद पडल्यानेच ते फ्रस्टेशन काढत आहेत, अशा शब्दात मुख्यमत्र्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत भाजपा सरकारची पोलखोल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तरे दिली. लोकांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा? तुमच कर्तृत्व काय? लोकांनी तुम्हाला का नाकारलं याचा विचार करा. केवळ चांगलं भाषण करता येतं म्हणजे झालं असं नाही. घरात बसून तेंडुलकरने फुलटॉस असाच खेळायला पाहिजे होते, तसाच खेळायला पाहिजे होता, हे सांगण सोपं असतयं. पण, प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळायला, हवं. राज ठाकरे हे रिटार्यट असून ते आता कॉमेंट्रीमनची भूमिका बजावत आहेत, माहिती नाही यांना मानधन मिळतंय की नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.